पनवेलच्या महसूल कार्यालयातील जुनाट व पुरातन दस्तावेजांचे संवर्धन करण्यासाठी दहा दिवसांपासून दहा कामगार राबत आहेत. रायगडच्या जिल्हाधिकारी शीतल उगले-तेली यांनी दिलेल्या आदेशानंतर हे काम हाती घेण्यात आले आहे. पनवेलमध्ये जमिनीच्या खरेदीविक्रीसाठी महसूल कार्यालयात मोठय़ा प्रमाणात कागदी दस्त जमा होतो. प्रत्येक जमिनीच्या वाद व प्रतिवादाची माहिती न्याय निवाडय़ात दाखल केली जाते. मात्र त्यानंतर या दस्तांचे काय हा प्रश्न मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. सरकारी कागदपत्रांची जपणूक करण्यासाठी काढण्यात आलेल्या अधिसूचनेच्या आधारावर पनवेल महसूल विभागातील अनावश्यक दस्त नष्ट करण्यात आले. सहा ट्रक भरून कागदी दस्तावेज नष्ट करण्यात आल्याची माहिती महसूल विभागाने दिली. मात्र महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी १७०० सालापासूनची जमिनीचे दस्तावेज, न्यायनिवाडे संवर्धित करण्याचे काम तहसीलदार दीपक आकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. संबंधित दस्त वर्ष व प्रत्येक प्रकरणानुसार लाल लखोटय़ात बांधून ते सुरक्षित लोखंडी मांडणीत ठेवण्यात आले आहेत.