पास देणारी टोळी पनवेल शहर पोलिसांच्या ताब्यात

पनवेल : टाळेबंदीत अडकलेल्या नागरिकांना गावाकडे जाण्याची ओढ आहे. अशा अडलेल्या नागरिकांना लक्ष्य करून त्यांच्याकडून एका ई प्रवास पाससाठी तब्बल पाचशे रुपयांना विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात पनवेल शहर पोलिसांना यश आले आहे.

एका ई सेवा केंद्रातील जागरूक व्यावसायिकाला ग्राहकाने आणलेल्या प्रवास पासचा क्यूआर कोड खुला (स्कॅन) होत नसल्याने त्याला संशय आला. येथून ई पास देणाऱ्या टोळीच्या कारवाईचा थांगपत्ता पनवेल शहर पोलिसांना लागला. ई सेवा केंद्र चालविणाऱ्या व्यावसायिकाने ही बाब प्रथम पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय लांडगे यांना सांगितली. असे चार पासचे क्यूआर कोड इंटरनेटवर स्कॅन होत नसल्याने पोलिसांनीही संबंधित बीड व जालना येथील पास मिळविलेल्या व्यक्तींकडे चौकशी  केली. पास मिळविलेल्या व्यक्तींनी फोनद्वारे संपर्क करुन खारघर वसाहतीमधील सेक्टर ३५ येथील गार्डनकोर्ट या इमारतीमध्ये राहणारा सलीम शेख याच्याकडून पास खरेदी केल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी सलीमला ताब्यात घेतल्यावर या टोळीचे धागेदोरे मुंबईपर्यंत पसरल्याचे उजेडात आले आहे.

प्रवासाचे व प्रवाशाचे नाव बदलून सलीम व त्याची टोळी ग्राहकांना एक ई पास रायगड जिल्हाधिकाऱ्याच्या सहीचा देत होते. पोलीस निरीक्षक विजय तायडे, उपनिरीक्षक सुनील तारमाळे, दीपक कादबाने यांच्यासह पथक मुंबई येथील टोळीचा शोध घेत आहे. या प्रकरणामुळे मुंबई, पनवेल, ठाणे या परिसरात अडकलेल्यांना परजिल्ह्यात त्यांच्या गावी जाण्यासाठी येणाऱ्या अडचणींचा अनुभव आला आहे. या प्रकरणात दुकलीला बनावट ई पास खरेदी केल्यामुळे पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागले आहे. हे करंजाडे वसाहतीमध्ये रहिवाशी आहेत. कोणत्याही खासगी व्यक्तीकडून अथवा अन्य संकेतस्थळावर असे पास मिळत नसून परजिल्ह्यात पास मिळविण्यासाठी पोलिसांनी जाहीर केलेल्या covidrz.mhpolice.in या संकेतस्थळावर पास मिळविण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.