सीमा भोईर

दोन वर्षांनंतरही पायाभरणीच; खोदलेले खड्डे धोकादायक

पनवेल रेल्वे स्थानकात अतिरिक्त फलाटासाठी खोदलेल्या खड्डय़ात काही दिवसांपूर्वी दोन चिमुरडय़ांचा जीव गेला, तरीही या कामाने गती घेतलेली दिसत नाही. अतिशय संथगतीने हे काम सुरू असून २०१९ ची दिलेली मुदतही संपत आली असून आणखी दोन वर्षे हे काम रेंगाळण्याची शक्यता आहे. अतिरिक्त फलाटासाठी जर चार वर्षे लागणार असतील तर पनवेल रेल्वे स्थानकाचा कायापालट कधी होणार, हा प्रश्न पनवेलकर विचारत आहेत.

२०१७ ला हे काम सुरू झाले असून स्थानक परिसराचा उकिरडा झाला आहे. दोन वर्षे संपूनही फलाटांची साधी पायाभरणीही नीट झाली नसल्याचे दिसत आहे.

जेएनपीटी बंदरातून होणारी मालवाहतूक वाढल्याने पनवेल रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक ३ व ४ हे मालगाडय़ांसाठी राखीव ठेवण्यात येणार असल्याने लोकलसाठी दोन फलाटांचे नियोजन करण्यात आले. जुन्या पनवेलच्या दिशेने या दोन फलाटांचे काम सुरू आहे. संबंधित फलाट होत असलेल्या जागेत जी रेल्वेची कार्यालये आहेत. तीही तोडणार असून, त्या जागी नवीन जी प्लस फाय अशी नवीन

इमारत बांधण्यात येणार आहे. यामुळे पनवेल स्थानकाची व्याप्ती वाढणार आहे. या प्रकल्पास ६० कोटी रुपये खर्च येणार आहे. संबंधित फलाटांचे काम २०१९ पयर्र्त पूर्ण होणार असल्याचे तत्कालीन स्टेशनमास्टर बी.के. गुप्ता यांनी सांगितले होते, मात्र हे काम रेंगाळले आहे. सहा महिन्यांपूर्वी या कामासाठी खोदलेल्या खड्डय़ात दोन लहान मुली पडून त्यांचा मृत्यू झाला होता. यानंतर तरी प्रशासन वेगाने काम करेल अशी अपेक्षा होती. मात्र तरीही काम संथ गतीनेच सुरू आहे. या कामासाठी मोठमोठे खड्डे खोदले असून यात पाणी, कचरा साचला आहे. साचलेल्या या पाण्याला दरुगधी येत आहे. घाणीमुळे मोठया प्रमाणावर डासांची उत्पत्तीही वाढली आहे. यामुळे फलाट क्रमांक १ वरील प्रवाशांना नकोसे होत आहे. या पाण्यात डेंग्यूच्या अळ्या असण्याची भीतीही प्रवासी व्यक्त करत आहेत.

दोन वर्षांपासून रेल्वेच्या माध्यमातून अतिरिक्त फलाटाची कामे सुरू आहेत, मात्र त्यातील एक टक्काही काम पुढे सरकलेले नाही. शिवाय सुरक्षेची काळजी घेतली जात नाही.

– सुधाकर पाटील, रहिवाशी, नवीन पनवेल

पनवेल रेल्वे स्थानकाचे काम खरोखरच धिम्या गतीने सुरू आहे. संबंधित काम पूर्ण होण्यासाठी आणखी दोन वर्षे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. निधीची कोणतीही अडचण नाही, मात्र कंत्राटदाराच्या अडचणीमुळे काही दिवस कामही ठप्प होते.

– एस.एम. नायर, स्टेशनमास्तर

दुर्घटनेची शक्यता

अतिरिक्त फलाटांसाठी खोदून ठेवलेल्या खड्डय़ात पाणी साचल्याने त्यात बुडून ६ महिन्यांपूर्वी दोन अल्पवयीन मुली मृत्युमुखी पडल्या होत्या. त्यानंतर खड्डे सुरक्षेची काळजी घेतल्याचे नाटक काही दिवस करण्यात आले. मात्र पुन्हा येथील परिस्थिती धोकादायक आहे. पुन्हा दुर्घटनेची शक्यता नाकारता येत नाही.