पनवेलच्या ग्रामीण रुग्णालयाला आठ महिन्यांपासून प्रतीक्षा

पनवेल : पनवेल येथील ग्रामीण आरोग्य रुग्णालयाच्या विच्छेदनगृहात आठ महिन्यांपासून ‘कटर’ उपलब्ध नसल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांना खासगी मदतीवर अवलंबूनच सर्व कारभार करावा लागत आहे. विच्छेदनावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांचा मदतनीस म्हणजे कटर होय. कटर पाहिजे यासाठी मागील आठ महिन्यांपासून पनवेल ग्रामीण रुग्णालयातील प्रभारी वैद्यकीय अधीक्षकांनी तीन वेळा पत्रव्यवहार करूनही ‘कटर’ उपलब्ध करून देण्यात आलेला नाही.

पनवेल येथील ग्रामीण रुग्णालयाच्या अखत्यारीत सर्व मृत व्यक्तींचे विच्छेदन करण्यात येतात. जवळपास साडेनऊशेहून अधिक मृतदेहांचे विच्छेदन येथे केले जाते. जिल्हा शल्य चिकित्सकाच्या देखरेखीखाली या विभागाचे काम चालते. पनवेलमध्ये एकही सरकारी  शवागार नाही. शवविच्छेदनगृह पनवेल पालिकेच्या इमारतीशेजारीच असल्याने विच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयातून डॉक्टरांना तिथपर्यंत जावे लागते. विच्छेदनगृहात एकही सरकारी रखवालदार वा मदतनीस नसल्याने डॉक्टरच सर्व प्रक्रिया पार पाडतात. सध्या येथे एक खासगी मदतनीस वैद्यकीय अधिकाऱ्यांना सहकार्य करतो. ग्रामीण रुग्णालय विच्छेदनगृहापासून दूर असल्याने खासगी मदतनीसालाच नातेवाईकांची मदत घेऊन रुग्णवाहिकेतून शव उचलणे, विच्छेदनाच्या ओटय़ावर ठेवणे, वैद्यकीय अधिकाऱ्यांना मदत करणे अशी अनेक कामे करावी लागतात. याच सर्व प्रक्रियेमध्ये सरकारी मदतनीस (कटर) हवा अशी मागणी मागील आठ महिन्यांपासून होत आहे. यापूर्वी मदतनीस असणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याने ते पद रिक्त आहे. जिल्हा आरोग्य विभागाने हे पद न भरल्याने त्याचा त्रास नातेवाईकांना होत आहे. बेवारस मृतांच्यावेळी मात्र याहून विचित्र परिस्थिती ओढावते. नवी मुंबई पालिकेने काही दिवसांसाठी ‘कटर’ द्यावा अशी मागणी पनवेल ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने करण्यात आली होती, मात्र ही मागणी धुडकावण्यात आली.

आम्ही यापूर्वी वरिष्ठांकडे मदतनीस मागितला आहे. मृतदेहाची चिरफाड करताना त्याची गरज भासते. मदतनीस मिळाल्यावर हे काम सुसह्य़ होईल. आम्ही नवी मुंबई पालिकेची मदत मागितली होती. मात्र ती मिळू शकली नाही.

डॉ. नागनाथ येमपल्ली, प्रभारी अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, पनवेल

शव विच्छेदनासाठी कटर (मदतनीस) अशा वेगळ्या पदाची तरतूद नाही. तशी मागणी आमच्याकडे झालेली नाही. मात्र चतुर्थ श्रेणी कामगार पनवेल ग्रामीण आरोग्य विभागाला देण्याचा प्रस्ताव आम्ही तयार केला आहे. लवकरच तेथील रिक्त पद भरल्यानंतर शव विच्छेदनासाठी मदतनीस नेमता येईल.

डॉ. अजित गवळी, जिल्हा शल्यचिकित्सक, रायगड