११० शिक्षकांच्या चाचणीत सहा करोनाबाधित

लोकसत्ता प्रतिनिधी

पनवेल : सोमवारपासून शाळा सुरू करण्याची पालिका व खासगी शिक्षण संस्थांनी तयारी केली असली तरी अनुदानित शाळेतील ११० शिक्षकांनी केलेल्या करोना चाचणीत सहा शिक्षक बाधित आढळले आहेत. त्यामुळे पालक संमतिपत्र देण्यास तयार नाहीत, तर पालिका प्रशासनही ठाम भूमिका जाहीर करीत नसल्याने शाळांबाबत संभ्रम वाढला आहे.

पनवेल तालुक्यामध्ये नववी ते बारावीपर्यंतच्या अनुदानित व विनाअनुदानित १६३ शाळा, महाविद्यालयांमध्ये ५१ हजार विद्यार्थी शिकत आहेत. यासाठी २५१० शिक्षक असून त्यांच्या करोना चाचण्या करण्यात येत आहेत. खासगी विनाअनुदानित शाळेतील १६३८ शिक्षकांच्या चाचणी करण्याची जबाबदारी खासगी शिक्षण संस्थांनी उचलावी असे परिपत्रक काढले आहे.

अनुदानित शाळांतील ८७२ शिक्षकांची चाचणी उपजिल्हा रुग्णालयात सुरू करण्यात आली आहे. दिवसाला शंभराहून जास्त शिक्षकांची करोना चाचणी करण्याचे नियोजन आहे. गुरुवारी ११०, तर शुक्रवारी १०७ शिक्षकांची करोना चाचणी करण्यात आली. गुरुवारी केलेल्या चाचणीत सहा शिक्षक करोनाबाधित असल्याचे आढळले आहेत.  त्यामुळे प्रत्येक शंभर शिक्षकांमागे सहा शिक्षण करोनाबाधित झाले तर मोठा पेच निर्माण होणार आहे. पालक आपल्या मुलांना शाळेत पाठविण्यास संमती देताना भीती व्यक्त करीत आहेत.

रायगड जिल्ह्यत पनवेल ही एकमेव महानगरपालिका आहे. मुंबई महानगरप्रदेश क्षेत्रातील ठाणे जिल्ह्यत असणाऱ्या इतर पालिका शाळा सुरू करण्याबद्दल जो निर्णय घेतील तसाच समांतर निर्णय पनवेल पालिका क्षेत्रात शिक्षण विभागात घेतला जाईल, असे पालिका आयुक्त  सुधाकर देशमुख, यांनी सांगितले.

नियमांचे पालन झाल्यास शाळा सुरळीत

शाळा व्यवस्थापनाने शाळा सुरू करण्यात उत्साह दाखविला आहे. अनेक ठिकाणी शाळांच्या र्निजतुकीकरणाचे काम सुरू आहे. खासगी विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांच्या करोना चाचणी (आरटीपीसीआर) शासनमान्यता असणाऱ्या खासगी प्रयोगशाळांमधून करू शकतील, असे आदेश पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिले आहेत. विद्यार्थी व शिक्षकांच्या खबरदारीसाठी शिक्षण विभागाने नियोजन केले आहे. सर्वानीच नियमांचे पालन केल्यास काही दिवसांत शिक्षणदानाची मोहीम प्रत्यक्षात सुरू होईल, असे गट शिक्षण अधिकारी नवनाथ साबळे यांनी सांगितले.