‘होम मिनिस्टर फेम’ आदेश बांदेकर यांच्या विरोधात शिवसैनिकांची मोहीम; निवडणुकीची रणनिती ठरविण्यात अपयशी ठरल्याचा आरोप

पनवेल महापालिका क्षेत्रामध्ये शिवसेनेचे नेतृत्व करण्याची जबाबदारी मातोश्रीने ‘होम मिनिस्टर’ या मालिकेतून घरोघरी पोहचलेल्या भावोजी म्हणजेच आदेश बांदेकर यांच्यावर सोपवली आहे. बांदेकर महिन्यातून तीनदा मुंबईहून पनवेलला येतात, सैनिकांना भेटतात, तरीही पक्षाच्या निवडणूक डावपेचांची दिशा ठरत नसल्याची आणि दशा सुधारत नसल्याची भावना काही शिवसैनिकांत निर्माण झाली आहे. त्यामुळे काही मोजक्या शिवसैनिकांनी बांदेकर हटाव मोहीम सुरू केली आहे. यासाठी पनवेलमध्ये बैठका घेण्यात आल्या असून त्यात बांदेकर यांच्यामुळे पनवेलमध्ये शिवसेना कोणत्याही राजकीय पक्षाशी हातमिळवणी करू शकली नाही, असे मत मांडण्यात आले आहे. बांदेकरांनी मात्र हे आरोप फेटाळत आपला जनसंपर्क पनवेलमध्ये मजबूत असल्याचा दावा केला आहे.

पनवेलमध्ये नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये शिवसेना एकटीच सर्व राजकीय पक्षांना भिडली. जिल्हा परिषदेच्या काही जागांवर उमेदवार न मिळाल्याची नामुष्की याच निवडणुकीत शिवसेनेवर आली. शेतकरी कामगार पक्षाच्या मैत्रीपूर्ण लढतीमुळे यापूर्वी पंचायत समितीच्या उपसभापती पदावर सेनेला बसता आले आहे. गावागावांत शाखा व शहरांमध्ये शिवसैनिकांची मोठी फळी असली तरी सेना पनवेलमध्ये भुईसपाट झाली.

पनवेल महापालिकेच्या पहिल्याच निवडणुकीत शिवसेनेवर ही वेळ ओढवू नये म्हणून काही शिवसैनिकांनी आपली मोट बांधण्याचा व मुंबईहून येणाऱ्या ‘आदेशा’विरोधात स्थानिकांची एकजूट ठेवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. काही शिवसैनिक भारतीय जनता पक्षाशी युती करण्यास तयार आहेत. तसेच सेनेचे रायगड जिल्हाप्रमुख आमदार मनोहर भोईर व शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार विवेक पाटील यांच्यातून विस्तव जात नसल्याने ते सेनेच्या विरोधात आहेत. २५ वर्षांहून अधिक काळ शिवसेनेशी एकनिष्ठ असलेले माजी जिल्हाप्रमुख बबन पाटील यांना मागील वर्षभरापासून पक्षाने बाजूला सारले आहे. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये नाराजी आहे. या अंतर्गत कलहामुळे पक्षाने अद्याप साडेपाच महिने उलटले तरी पालिका क्षेत्राची जबाबदारी नवीन खांद्यावर ठेवलेली नाही. अद्याप हातमिळवणीचे व उमेदवारीचे निश्चित न झाल्यामुळे सामान्य कार्यकर्ते संभ्रमात आहेत.

आदेश बांदेकर हे पनवेलमधील कार्यकर्त्यांच्या बैठकीतील भाषणात मुंबईहून आमदार व शाखाप्रमुखांची फळी पनवेलमध्ये प्रचारासाठी उतरवणार असल्याचे सांगतात, मात्र मुंबईकरांना पनवेलकरांचे प्रश्न कसे माहीत असणार, असा सवाल ज्येष्ठ शिवसैनिक करत आहेत. सैनिकांनी बांदेकरांना युती कोणाशी हा प्रश्न विचारल्यावर ते मातोश्रीकडे बोट दाखवितात. अवघ्या काही दिवसांवर निवडणुका आहेत. विरोधकांचे फलकयुद्ध सुरू आहे. राजकीय पक्ष टँकरद्वारे मोफत पाणीवाटप करून घरोघरी पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. पण शिवसेना अद्याप युती कोणाशी करावी या संभ्रमात आहे. यामुळेच पक्षाच्या वाटय़ाला उपमहापौरपद नाही, तरी निदान समित्यांचे सभापतीपद तरी येईल का, असा प्रश्न शिवसैनिकांना पडला आहे.

निखाऱ्यावर चालणारा शिवसैनिक हवा!

माझ्यामुळे कोणतीही दुफळी पडलेली नाही. उलट मी पनवेल व रायगडमधील सामान्य सैनिक जोडण्याचे काम केले आहे. उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे आम्हाला अस्थनीतील निखारे नकोत, निखाऱ्यावरून चालणारा सच्चा शिवसैनिक हवा आहे. त्याच पद्धतीने माझे काम सुरू आहे. काही अल्पसंतुष्टांनी बैठक घेतल्याचे मला कळले आहे. पनवेलमध्ये कोणाशी युती करावी हा निर्णय फक्त आमचे नेते पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच घेतील, हेच मी कार्यकर्त्यांना सांगेन. उद्याही मी पनवेलमध्ये आहे. तिथे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती होणार आहेत. दक्षिण रायगड जिल्ह्य़ातील पक्षविरोधी कृत्ये करणाऱ्यांवर कारवाई कालच केली आहे. पनवेलमध्ये तसे आढळल्यास तेथेही पक्षप्रमुख नक्कीच कारवाई करतील. शिवसेना कधीच दुबळी नव्हती, सामान्यांच्या हितासाठी झटणारी सेना व सैनिक हे येत्या निवडणुकीत विरोधकांना आमची ताकद दाखवून देतील.