पनवेल : अत्यावश्यक सेवेसह इतर सेवा पुरविणारी दुकाने व आस्थापना पनवेलमध्ये सुरू करण्यात आले आहेत. मात्र सायंकाळी चार वाजेपर्यंतच सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. अनेकांनी सकाळी सात वाजल्यापासून दुकाने व कार्यालयातील स्वच्छतेचे काम सुरू होते. सोमवारी पहिला दिवस असल्याने दुकानदार ग्राहकांच्या प्रतीक्षेत होते.

पनवेल पालिका तिसऱ्या टप्प्यात असली तरी येथील सध्याची लोकसंख्या दहा लाखांवर असल्याने टाळेबंदीच्या खुल्या धोरणातील चौथ्या टप्प्यातील सर्व नियम पनवेल पालिकेला लागू झाल्याची माहिती पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिली.

पनवेलमधील मॉल्स, सिनेमागृह आणि नाट्यगृह पूर्णपणे बंद राहणार आहेत. उपाहारगृह ५० टक्के क्षमतेने सायंकाळी चार वाजेपर्यंत सुरू राहतील तर पार्सलसेवा नियमित सुरू राहणार आहे. अत्यावश्यक कर्मचाऱ्यांनाच रेल्वेप्रवास सुरू ठेवल्याने बसथांब्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. मैदानी खेळासाठी आठवडाभराची मुभा पनवेल पालिकेने दिली असून सकाळी सात ते नऊ  त्यानंतर सायंकाळी सहा ते रात्री नऊ वाजेपर्यंतच्या वेळेत नागरिक मैदानात खेळू शकतील. ५० व्यक्तींमध्ये लग्नसमारंभ साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. व्यायामशाळा, सलून, स्पा, ब्युटीपार्लर ५० टक्के क्षमतेने सायंकाळी चार वाजेपर्यंतच सुरू राहतील.

पाचपेक्षा अधिक नागरिक एकत्र येण्यास निर्बंध

पाचपेक्षा अधिक व्यक्ती सकाळी सात ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत एकत्र जमू शकणार नाहीत. तसेच पाच वाजल्यानंतर एका व्यक्तीसही विनाकारण बाहेर फिरल्यास फौजदारी कार्यवाहीची अट पनवेल पालिका क्षेत्रात अमलात आणली आहे. विशेष म्हणजे विमानतळाच्या नामकरणाच्या वादामुळे प्रकल्पग्रस्तांच्या संघटनांनी तीन दिवसांनी मानवी साखळीचे आयोजन केले आहे. पालिकेच्या या नियमामुळे पोलीस व पालिकेचे मनाईआदेश झुगारून आंदोलने केली जाण्याची शक्यता आहे.