29 September 2020

News Flash

स्मार्ट सिटी करण्याचा ध्यास

महापालिकेने अमृत योजनेमध्ये घेतलेल्या सहभागामुळे पनवेलकरांच्या पाणीपुरवठय़ाच्या योजनेचे काम सुरू आहे.

पनवेल महापालिकेला केंद्राच्या स्मार्ट सिटी योजनेमध्ये आणण्यासाठी पालिका प्रशासनाने राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू केला असून सध्या अल्प उत्पन्न असलेल्या पालिकेचा स्मार्ट सिटी योजनेमध्ये समावेश झाल्यास विकास निधीच्या रूपात सुमारे ८०० कोटी रुपयांचा निधी पालिकेच्या तिजोरीत जमा होईल, सोबत केंद्र व राज्य सरकारचे पनवेलचे रूपडे बदलविण्यासाठीचे मार्गदर्शन मिळेल. विकासकामे होत असताना पालिका प्रशासनासोबत केंद्र व राज्य सरकारच्या प्राधिकरणांचे विकासकामांवर नियंत्रण राहील आणि त्यामुळे होणारी कामे उत्तम दर्जाची होतील यासाठी माझा पाठपुरावा राज्य सरकारकडे सध्या सुरू आहे. पहिल्या दिवसापासून पनवेल महानगरपालिकेची पहिली प्राथमिकता स्वच्छता हीच असणार आहे. तसा निर्धारच मी आणि माझ्या प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे शहर हागणदारीमुक्त करण्यासाठी, स्वच्छतागृेह उभारणीसाठी निधी उपलब्ध करून दिला जात आहे. शहरामधील सार्वजनिक स्वच्छतागृहांची दुरुस्ती करून ही स्वच्छतागृहे नागरिकांनी वापरावीत अशा स्थितीत आणण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. आजमितीला पनवेल पालिका क्षेत्रामध्ये साडेतीन हजार स्वच्छतागृहे आहेत. भविष्यात आणखी साडेतीन हजार स्वच्छतागृहे पनवेलमध्ये बांधण्याचा संकल्प पालिकेचा आहे.

स्वच्छ व सुंदर पनवेलची वाटचाल करण्यासाठी घनकचऱ्याचा प्रश्न सोडवावा लागणार आहे. पालिका क्षेत्रामधील घराघरांमधील ओल्या व सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण करून ओल्या कचऱ्याची विक्रेंदीकरण पद्धतीने विल्हेवाट लावणार आहेत, तसेच सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण करून त्याचा पुनर्वापर करता येईल का, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. पालिकेने कचऱ्यापासून इंधन बनविता येईल या शास्त्रोक्त पद्धतीचा वापर करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

महापालिकेने अमृत योजनेमध्ये घेतलेल्या सहभागामुळे पनवेलकरांच्या पाणीपुरवठय़ाच्या योजनेचे काम सुरू आहे. यामध्ये पनवेलसाठी नवीन जलवाहिन्या टाकणे आणि परिसराच्या क्षमतेनुसार जलकुंभ बांधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. २७ कोटी रुपयांच्या या कामामुळे पनवेलकरांना यापुढे पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार नाही.

या पालिकेचा ६० टक्के परिसर हा सिडको प्रशासनाचा आहे. या परिसराचे सिडकोकडून हस्तांतरण करून घेण्याचे काम ज्या पद्धतीने महत्त्वाचे आहे त्याच पद्धतीने सिडकोने येथील प्रकल्पग्रस्तांना वसाहतींचे निर्माण करताना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याचे काम किती प्रमाणात पूर्ण झाले याची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. पनवेल महापालिका तीन विविध वर्गामध्ये विभागली गेली आहे. त्यामध्ये पहिल्या टप्प्यात सिडको प्रशासनाने नियोजन केलेला हा भाग आणि दुसरा जुन्या पनवेल नगर परिषदेमधील अरुंद रस्ते व इतर नागरी समस्यांचा भाग आहे. तसेच तिसऱ्या भागामध्ये पनवेलच्या ग्रामीण परिसरातील खेडय़ांचा परिसर आहे. या खेडय़ांमधील ग्रामपंचायती संपुष्टात येऊन त्याचे रूपांतर महापालिकेमध्ये झाले आहे. या प्रत्येक भागाच्या गरजा व प्रश्न वेगळे आहेत. त्या अनुषंगाने प्रत्येक भागाची गरज लक्षात घेऊन तेथे महापालिकेच्या नवीन योजना आणण्याचे काम सुरू आहे. पनवेल शहरामध्ये रस्ते अरुंद व कच्चे आहेत. त्यामध्ये तेथे रस्त्यालगतच्या घरमालकांना विशासात घेऊन रस्त्यांची रुंदी व हे रस्ते काँक्रीटीकरणाचे काम करणे गरजेचे आहे. रस्त्यासोबत पदपथ तयार करणे आवश्यक आहे. पनवेलमध्ये वीजजोडण्या या खांबांवरून दिलेल्या आहेत. त्यामुळे या वीजवाहिन्या भविष्यात भूमिगत कराव्या लागणार आहेत. शहरातील सर्वात मोठी समस्या पार्गची आहे. ही समस्या सोडविण्यासाठी शहरामधील सर्वाधिक वाहने येण्याची ठिकाणे कोणती व तेथील वाहनतळाचे नियोजन यासाठी सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. या सर्वेक्षणाचा अहवाल आल्यानंतर विविध ठिकाणी वाहनतळ बनविण्याचे काम सुरू होईल. सध्या फडके नाटय़गृहाशेजारी वाहनतळ बांधण्याच्या कामाचा आराखडा बनविण्याचे काम सुरू आहे. तेथे सुमारे दीडशे वाहने उभी राहू शकतील. तसेच पालिका स्वखर्चाने वाणिज्य संकुल उभारत आहे. त्या इमारतीमध्ये दोन मजले हे वाहनतळासाठी राखीव असणार आहेत. तेथेही दीडशे वाहने उभी राहू शकतील.

पनवेलची लोकसंख्या एक लाखावर गेली आहे, मात्र शहराची ओळख सांगणारा बगीचा येथे नाही. शहरामधील साईनगर परिसरामध्ये २२ एकर जमिनीवर विस्तीर्ण अशी बाग तयार करण्याचे काम पालिकेमध्ये प्रस्तावित आहे. त्यामुळे ज्येष्ठांना व बच्चेकंपनीचे चांगलेच मनोरंजन होईल. शहरामधील बगीच्याप्रमाणे पनवेल हे तळ्यांची ओळख सांगणारे असल्यामुळे शहरामधील सर्वात मोठय़ा वडाळे तलावाच्या सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. ३१ एकर जमिनीवर विस्तारलेल्या वडाळे तलावामधील जलपर्णी काढण्याचे काम सुरू आहे. तलावाभोवताली अत्याधुनिक पद्धतीचे कुंपण बांधणे, नागरिकांना बसण्यासाठी बाक बसवणे, तलावामध्ये कारंजे बांधणे व बोटिंगची सोय करण्याचे विचाराधीन आहे. त्यामुळे येथे वाहनतळाचे नियोजन करण्यात आले आहे. सध्या पालिकेमध्ये मालमत्ता कराच्या सर्वेक्षणाचे काम सुरू असून ड्रोन कॅमेऱ्याच्या साह्य़ाने मोजमाप करणारी पनवेल ही पहिलीच महापालिका असल्याचे मला वाटते. मालमत्ता कराच्या सर्वेक्षणानंतर पालिकेच्या करात वाढ होईल आणि याच निधीतून सर्व विकासकामे जलद होऊ शकतील. त्यामुळे सर्वेक्षणानंतर नेमके किती खातेधारक आहेत आणि त्यांच्याकडून कोणत्या दराने पालिकेने मालमत्ता कर वसूल करावा याचेही नियम ठरवता येतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 9, 2017 12:27 am

Web Title: panvel smart city
Next Stories
1 गरजेपोटीच्या घरांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
2 प्रकल्पग्रस्तांना २ वर्षांची हमी
3 स्मार्ट शहर.. लोकाभिमुख प्रशासन
Just Now!
X