|| सीमा भोईर

उन्हाचे चटके खात प्रतीक्षा; पनवेल एस.टी स्थानकात प्रवाशांची गैरसोय

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ होत असल्याने पनवेल आगाराचा कायापालट करीत विमान प्रवाशांच्या दर्जाच्या सुविधा देण्याचे आश्वासन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी दिले आहे. हे होईल तेव्हा होईल, पण सहा वर्षांपूर्वी धोकादायक ठरवून पाडलेली इमारत तरी करा, असा संतप्त सवाल आता प्रवासी करीत आहेत.

नवीन इमारत अद्याप न झाल्याने प्रवाशांना अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. ऊन, पावसात गाडय़ांची तासन तास प्रतीक्षा करावी लागत आहे. रायगडसह पश्चिम महाराष्ट्रात जाण्यासाठी हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने रात्रंदिवस येथे प्रवाशांची मोठी वर्दळ असते. मध्यवर्ती एस.टी. स्थानक असूनही आगाराची विकासकामे मात्र संथगतीने सुरू आहेत. मुख्य इमारत होणार तरी कधी? असा प्रश्न प्रवासी विचारत आहेत.

१९५३ साली पनवेल एसटी स्थानकाची इमारत बांधली होती. १९७१ साली दुसरी इमारत उभारण्यात आली. बांधकाम जुने झाल्याने नगरपालिकेची धोकादायक इमारतीचीनोटीस आल्यामुळे दोन्ही जुन्या इमारती सहा वर्षांपूर्वी तोडाव्या लागल्या. त्यामुळे केळवणे, आवरे, चिरनेर, खोपटे, साई, गव्हाण, उलवा या मार्गावर जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत आहे. एस.टी. प्रशासनाने एक शेड उभारली आहे, पण ती पुरेशी नाही.

ठाणा, मुंब्रा, दिवा, कल्याण, डोंबिवली, दादर या ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांसाठी स्थानकाचे कामही अर्धवट आहे. त्यामुळे ऊन, पावसाचा त्रास सोसत प्रवाशांना बसची वाट पाहत उभे राहावे लागत आहे. पावसाळ्यात तर स्थिती अधिकच बिकट होते. त्यामुळे प्रवासी तीव्र संताप व्यक्त करीत आहेत. जुने स्थानक तोडल्यामुळे स्थानकातील बकालपणा वाढला आहे. लवकरात लवकर नवीन इमारत उभारावी अशी मागणी होत आहे.

निविदा काढण्यात आल्या असून कंत्राटही देण्यात आले आहे. बीओटी या तत्त्वावर स्थानकाची आधुनिक इमारत बांधकाम करण्यास दिली आहे.   -विलास गावडे, आगार व्यवस्थापक

मी कित्येक दिवस येथून नियमित प्रवास करत आहे. इमारत तोडल्याने अनेक अडचणी येत आहेत. येथील बकालपणाही वाढला आहे. नवीन इमारत लवकर उभारावी.   -सविता पाटील, प्रवासी