लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नवी मुंबई : टाळेबंदी, सणवार आणि सार्वजनिक सुट्टी काळात उरण क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात खाडीकिनारी भराव टाकून खारफुटी नष्ट केली जात आहे. स्थानिक प्राधिकरण या भराव तंत्राकडे काणाडोळा करीत असल्याचे दिसून येत आहे. मागील आठवडय़ात दिवाळीच्या सुट्टय़ांचे औचित्य साधून पनवेल-उरण मार्गावरील खाडीकिनारच्या सुमारे वीस एकर खारफुटीवर राडारोडा टाकण्याचे काम सुरू आहे.

मुंबई, ठाणे खाडीकिनारी भराव टाकून त्या ठिकाणी चाळी व बेकायदा बांधकामे करण्याचे एक तंत्र मागील वीस वर्षांत विकसित झाले आहे. नवी मुंबई हे एक नियोजनबद्ध शहर असल्याने सिडको व पालिकेने खाडीकिनारी अशा प्रकारे भराव टाकून जमिनी हडप करण्याचे तंत्र विकसित करण्यास पहिल्यापासून पायबंद घातला. मात्र उरण तालुक्यात सध्या खारफुटी, कांदळवन, पाणथळीच्या जागांवर राडारोडा टाकून जमीन तयार करण्याचे काम होत आहे. यात जेएनपीटी विस्ताराचे काम सुरू असल्याने उरण तालुक्यात सरकारी पातळीवर खाडीकिनारी भराव टाकण्याचे काम सुरू आहे. याच संधीचा फायदा उठवून खासगी प्रकल्पही खारफुटीवर राडारोडा टाकत आहेत. पनवेलपासून १२ किलोमीटर अंतरावरील द्रोणागिरी परिसरात मागील आठ दिवसांत भराव टाकण्यासाठी रस्ता तयार करण्यात आला आहे.

हा रस्ताही राडारोडा आणि मातीचा भराव टाकून केला आहे. दिवसाला शेकडो ट्रक माती या खारफुटी क्षेत्रात टाकली जात असून सिडको, पालिका, जिल्हाधिकारी आणि वन विभागाचे या भरावाकडे दुर्लक्ष आहे. येथील पर्यावरण संस्था या संदर्भात सातत्याने आवाज उठवीत असताना त्याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले जात आहे.

विकासाच्या नावाखाली कांदळवन नष्ट

द्रोणागिरी भागात सिडको विकासासाठी भराव टाकून सपाटीकरण करीत आहे. त्यासाठी लागणारी सागरी नियंत्रण विभागाची परवानगी घेण्यात आली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कांदळवन समितीने या जमिनींवर प्रत्यक्षात जाऊन पाहणी करावी असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. उरण तालुक्याच्या विकासाच्या नावाखाली मोठय़ा प्रमाणात कांदळवन नष्ट केले जात असल्याचा आरोप नॅट कनेक्टचे संचालक बी. एन. कुमार यांनी केला आहे.