संतोष सावंत

देहरंग धरणात आठ दिवसांचाच साठा; उसनवारीवर तहान भागविण्याची वेळ

पनवेलकरांच्या हक्काचे अप्पासाहेब वेदक जलाशय (देहरंग धरण) कोरडे होत चालले आहे. शेवटचे आठ दिवस पुरेल एवढेच पाणी या धरणात उरले आहे. ४० दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी सध्या देहरंग धरणात असून पाच एमएलडी पाणी दिवसाला वापरल्यास सरासरी आठ दिवस पुरेल एवढेच पाणी सध्या पालिकेच्या हक्काच्या धरणात शिल्लक आहे.

पनवेलकरांची तहान भागविण्यासाठी दिवसाला २९ एमएलडी पाण्याची आवश्यकता असताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (एमजेपी), महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ या प्राधिकरणांकडून (एमआयडीसी) अजून किती उसनवारी पाणी घेऊन पनवेलकरांची तहान कशी भागवावी, असा प्रश्न पनवेल पालिका प्रशासनाला पडला आहे.

शहरात मागील दीड महिन्यांपासून दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. पाण्याची टंचाई सोसणाऱ्या शहरवासीयांना सध्या पाण्याच्या भीषण संकटाने ग्रासले आहे.

देहरंग धरणातील साठय़ाने तळ गाठल्याने हीच टंचाई तीन दिवसांआड पाणी अशी वेळ पनवेलकरांवर येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दोन वर्षे सात महिने वय असलेली महापालिका आणि दीडशेवर्षांची नगर परिषद असे वय शहराचे असले तरी पाण्याबाबत नियोजन शून्य कारभार प्रशासन व सत्ताधाऱ्यांचा असल्याने ही स्थिती आहे.

शहरातील कोळीवाडा, मार्केटयार्ड, पायोनियर सोसायटी या मुख्य परिसरात पाण्याचे दुर्भिक्ष आहे. पाणी समस्येतून मुक्ती मिळविण्यासाठी भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी नगर परिषदेचे रूपांतर महापालिकेत केले. परंतु स्थानिक स्वराज्य संस्थेचा दर्जा बदलला तरी प्रशासनाची ढिम्मता अजूनही कायम आहे. तत्कालीन आयुक्त सुधाकर शिंदे गेले आणि विद्यमान आयुक्त गणेश देशमुख आले तरी परिस्थिती जैसे थेच आहे. चांगले दिवस यावेत यासाठी पनवेलकरांनी पालिका निवडणुकीत भाजपच्या हातात सत्तेच्या चाव्या दिल्या. परंतु सध्या वाईट दिवस पनवेलकरांच्या नशिबी आले आहेत.

देहरंग धरणाची क्षमता ३.५७ दश लक्ष घनमीटर (एमसीएम) एवढी आहे. म्हणजेच वर्षभरात दिवसाला बारा एमएलडी पाणी पनवेलकरांना मिळू शकेल एवढी या धरणाची क्षमता आहे. सध्या ४० एमएलडी पाणी या धरणात असल्याने अवघे आठ दिवस पुरेल एवढेच पाणी धरणात आहे. पनवेल पालिका स्थापन होऊन अडीच वर्षांहून मोठा काळ उलटला तरी अमृत योजनेला प्रत्यक्षात सुरुवात होऊ शकली नाही. केंद्र सरकारच्या अमृत योजना अद्याप कागदावरच आहे.

दोन दिवसांआड पाण्याचा पर्याय

ल्ल पनवेलकरांची तहान भागविण्यासाठी २९ एमएलडी पाण्याची गरज आहे. त्यापैकी एमजेपी १२ ते १३ एमएलडी पाणीपुरवठा करते. तर एमआयडीसी पनवेलसाठी ४ ते ५ एमएलडी पाणीपुरवठा करते.

आठ दिवसांनंतर देहरंग धरणातील पाणी संपणार आहे. सध्याचा धरणातील पाणीसाठी पाहता पनवेलकरांना दोन दिवसांआड पाणीपुरवठा करावा असाही एक पर्याय सुचविण्यात येत आहे.

जल अभियंताना जाब

या सर्व प्रशासकीय संथगतीच्या कारभारामुळे ज्या पनवेलकरांनी हक्काने भारतीय जनता पक्षाला अच्छे दिन आणण्यासाठी मते दिलीत त्या अच्छे दिन सुचविणाऱ्यांची मात्र झोप उडाली आहे.

भाजपचे पनवेल पालिकेतील विद्यमान नगरसेवक अनिल भगत आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांनी शुक्रवारी पालिकेचे जल अभियंता उल्हास वाड यांची भेट घेतली. अभियंता वाड यांच्यासमोर नगरसेवक भगत यांनी संतापजनक भावना व्यक्त करून पालिका प्रशासनाचा संथ कारभाराबद्दल नाराजी व्यक्त केली. नागरिकांनी भाजपला विश्वासाने मते दिलीत, त्यांना कोणत्या तोंडाने व काय उत्तर द्यावीत असा उपप्रश्न भगत यांनी अभियंता वाड यांना केला. आमदार प्रशांत ठाकूर यांना अनेक नागरिक चार दिवस पाण्याविना कसे राहतोय याबाबत आर्जवी करत आहेत. त्यांना नेमके कसे उत्तर द्यावे याबद्दल नगरसेवक भगत व ठाकूर विचारणा करत होते. वाड यांनी एमजेपीकडून अतिरिक्त पाणी पनवेल शहरात घेण्यासाठीची जलवाहिनीचा पर्याय कार्यान्वित केल्याची सबब दिली. परंतु त्यावर दोन्ही लोकप्रतिनिधींनी अभियंत्यांना गोल गोल उत्तर देण्यापेक्षा ठोस उत्तर द्या, नागरिकांची पाण्याची गरज भागवा असे खडे बोल सुनावले.

दहा एमएलडी पाण्यासाठी पालिका प्रशासनाची कसरत

एकीकडे हे भीषण संकट असताना पाताळगंगा नदीत टाटा पॉवरच्या प्रकल्पातून पडणारे पाणी रविवारी येत नसल्याने एमजेपी प्रत्येक आठवडय़ाच्या सोमवारी शटडाऊन घेते. त्यामुळे पुढील दोन दिवस एमजेपीच्या पाण्यावर अवलंबून असलेले पनवेलकरांचे नळ कोरडे पडतात. सुमारे दहा एमएलडी पाण्यासाठी पालिका प्रशासनाला कसरत करावी लागणार आहे. एमआयडीसी व एमजेपीकडील पाण्याची उसनवारीत वाढ करण्याची मागणी पालिकेने केली आहे. त्यावर अजून निर्णय झालेला नाही. दोन्ही प्राधिकरणांनी पाणी देण्याची क्षमता दाखविल्यानंतरही ग्रामीण पनवेलचा घसा कोरडाच आहे. विंधणविहिरी आणि विहिरींवर अवलंबून असणारी पनवेल पालिका क्षेत्रातील गावे संपूर्णपणे नैसर्गिक जलस्रोतावर अवलंबून आहेत.

देहरंग धरणातील पाणी संपणार हे माहीत असल्याने जानेवारीपासून दिवसाआड पाण्याचे नियोजन केले असून पाताळगंगा नदीतून सुमारे १०० एमएलडी पाणी आरक्षित केले आहे. पनवेल शहरातील फायर लाइनमध्ये एमजेपीकडून स्वतंत्र जलजोडणी घेतली आहे. त्यावर झोनल पद्धतीने पाणीपुरवठा शहरात केला जाईल. एमजेपीकडून पाणीपुरवठय़ात वाढ करून घेण्यासाठी बैठकांचे सत्र सुरू आहे.

-गणेश देशमुख, आयुक्त, पनवेल पालिका.

टँकरवर नागरिकांची भिस्त

पनवेल शहर आणि ग्रामीण परिसरातील तहान भागविण्यासाठी मार्च महिन्यापासून पनवेल पालिका प्रशासनाने पाण्याचे टँकर धोरण अवलंबले आहे. ज्या परिसरापर्यंत पाणी पोहचत नाही अशा गृहनिर्माण सोसायटय़ा व गावांना या टँकरमधून पाणीपुरवठा केला जातो. सध्या दिवसाला ३५ टँकरने पाणी शहरात व ग्रामीण परिसरात दिले जाते. त्यापैकी शहरात कोरडीचे साम्राज्य असल्याने २८ टँकर शहरात आणि ग्रामीण भागात ७ टँकर पाणी पोहचविले जाते. पुढील काळात हाच आकडा शतक पार करणार आहे.

यापूर्वी पनवेलची राजकीय घराणी ठाकूर व म्हात्रे हे त्यांच्या त्यांच्या सामाजिक संस्थांच्या मार्फत शहरातील टंचाईग्रस्त सोसायटय़ांमध्ये मोफत टँकर वाटप करून स्वत:च्या पदरात आशीर्वाद मिळवत होते. सध्या नगर परिषदेचे रूपांतर महापालिकेत झाल्याने हे सामाजिक हातांना परवडणारे नव्हते व आचारसंहितेमुळे हे करणे क्रमप्राप्त ठरणारे नसल्याने फुकट पाण्याचा मार्ग सामान्य पनवेलकरांसाठी बंद झाला. टँकर मागणीच्या ठिकाणीच जावा यासाठी प्रत्येक टँकरला जीपीएस प्रणालीच्या माध्यमातून प्रशासनाच्या देखरेखेखाली आणण्याचा प्रयत्न केला आहे. अजूनही पाण्याचे नियोजन व नवीन जलस्रोताचा पर्याय पुढे न आल्याने पुढील दिवसांत पाण्यावरून खडाजंगी होणार हे निश्चित आहे.