न्हावा शेवा पाणी प्रकल्पाला मंजुरी; १५३ दशलक्ष पाणीपुरवठा

झपाटय़ाने नागरीकरण वाढणाऱ्या पनवेल शहरातील पाणी प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने शुक्रवारी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांच्या बरोबर झालेल्या बैठकीत पनवेल शहराला १५३ दशलक्ष पाणीपुरवठा करण्यास हिरवा कंदील दाखविण्यात आला.

न्हावा शेवा पाणीपुरवठा टप्पा तीन विकसित करताना त्यातील १५३ दशलक्ष लिटर पाणी पनवेल करांच्या वाटय़ाला येणार असून येत्या तीन वर्षांत ही समस्या सोडविण्यात पनवेल पालिका यशस्वी ठरणार आहे.

दोन वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या पनवेल पालिकेचे क्षेत्रफळ तीन किलोमीटरवरून थेट १०० किलोमीटर पेक्षा जास्त विस्तारित झाले आहे. त्यामुळे पनवेलचा पाणी प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत चालला आहे. ऐन उन्हाळ्यात तर पनवेल पालिकेला जवळच्या नवी मुंबई पालिकेकडून उधार पाणी घेण्याची वेळ आली होती. पनवेलच्या आजूबाजूला सहा धरणे असताना पनवेलकरांना पाण्यासाठी दाहीदिशा फिरण्याची वेळ येत आहे. यावर उपाय म्हणून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून उभारण्यात येणाऱ्या न्हावा शेवा पाणीपुरवठा टप्पा तीनमधून पाणी घेणे हा होता मात्र निधी अभावी हा प्रकल्प पुढे रेटला जात नव्हता. पालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी शहरातील घनकचरा व्यवस्थापनाला दिशा दिल्यानंतर पाणी प्रश्नावर लक्ष केंद्रित केले आहे.

एमजेपीच्या या प्रकल्पासाठी ४०८ कोटी रुपये खर्च येणार आहे. पनवेलकरांना होणाऱ्या १०० दशलक्ष लिटर पाण्यासाठी १७३ कोटी देणे आवश्यक आहे. हा निधी केंद्र व राज्य सरकार विभागून देणार आहे. त्यामुळे पालिकेवर त्याचा बोजा पडणार नाही. पालिका हद्दीतील २९ गावांसाठी करावा लागणारा पाणीपुरवठा ५३ दशलक्ष लिटर पाण्यासाठी महानगर प्रदेश विकास प्राधिकरण १०० कोटी अनुदान देणार आहे. त्यामुळे पालिका हद्दीतील पनवेल शहर व गावांसाठी लागणारे १५३ दशलक्ष लिटर पाणी न्हावा शेवा पाणीपुरवठा प्रकल्पातून पालिकेला मिळणार आहे.

याशिवाय शहरी भागाला एमआयडीसी व सिडकोकडून पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे पुढील तीन वर्षांत पनवेलमधील पाणी समस्या संपुष्टात येऊन शहर पाण्यासाठी स्वयंपूर्ण होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.

तीन वर्षांत प्रकल्प पूर्ण

पनवेल शहरातील प्रमुख समस्या सोडविण्यावर भर देण्यात आला आहे. यात सिडकोकडून घनकचरा हस्तांतरण प्रक्रिया पार पाडल्यानंतर पालिकेने स्वत: ही जबाबदारी सांभाळली आहे. आता शहरातील सर्वात प्रमुख समस्या सोडविण्यासाठी न्हावा शेवा पाणीपुरवठा प्रकल्पाला शुक्रवारी नगरविकास विभागाने मंजुरी दिली आहे. येत्या तीन वर्षांत हा प्रकल्प पूर्ण होणार आहे. त्यानंतरच्या पाण्यासाठीही दीर्घ योजना तयार करण्यात येत असल्याचे पनवेल पालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी सांगितले.