२१ संशयितांची प्रकृती चांगली

पनवेल : दोन करोनाग्रस्त रुग्णांपैकी एक रुग्ण उपचारानंतर बरा झाला असून त्याला घरी सोडण्यात आले आहे. पनवेलमधील संशयीत २३ पैकी एकवीस जणांची करोना तपासणी ही नकारात्मक आली आहे. फक्त एका रूग्णावर उपचार सुरू आहेत ही पनवेलकरांसाठी दिलासा देणारी बातमी आहे.

मागील आठवडाभराच्या आरंभात पनवेलमध्ये पहिला करोनाचा रुग्ण  सापडल्यानंतर प्रशासनाची झोप उडाली होती. मात्र सरकारी विविध प्रशासनाने एकत्र येऊन करोना विषाणू नियंत्रणासाठी केलेल्या विविध उपाययोजनांमुळे आठवडाड्टारात पनवेलमधील परिस्थिती अटोक्यात असल्याचे दिसून येते. संशयीत २३ पैकी दोनच जणांना करोनाची लागण झाली होती. त्यातीलही पहिला रुग्णाला गुरुवारी रात्री प्रकृती बरी झाल्याने घरी सोडण्यात आले. तसेच परदेश प्रवास केलेल्या २७० प्रवाशांपैकी १०७ जणांना घरात अलगीकरणाचे १४ दिवस पूर्ण झाले आणि त्यांच्यातही करोना विषाणू असल्याची कोणतीही लक्षणे आढळली नाहीत. यामुळे पनवेलकर सुरक्षित आहेत असे मत पालिकेच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.

अजूनही नागरिकांनी करोनामुक्तीसाठी सतर्कता बाळगल्यास लवकरच परिसर करोनामुक्त होईल अशी अपेक्षा सरकारी प्रशासनाने व्यक्त केली आहे.

आठवडाभरापासून पनवेल पालिका, उपजिल्हा रुग्णालय, पोलीस व महसूल विड्टाागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून  विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. पनवेलमध्ये राहणारे मात्र परदेश प्रवास करुन आलेल्यांपैकी २७० जणांना घरातच अलगीकरण करण्यात आले होते. त्यातील १०७ जणांना १४ दिवसांनंतर कोणतीही लक्षणे न आढळल्याने हे प्रवासी सुरक्षित असल्याची माहिती पालिकेचे आरोग्य विभागाचे उपायुक्त संजय शिंदे यांनी दिली आहे. सध्या खारघर येथील ग्रामविकास भवनातील विलगीकरण कक्षात १३ प्रवाशांना ठेवण्यात आले आहे.

बाहेर पडणाऱ्यांची संख्या अधिक

पनवेलमधील ३७५ हून अधिक प्रवाशांनी परदेश प्रवास केल्याने करोनाची सुरुवात झाली असली तरी गृहसंस्थांमधील  जागृतीमुळे प्रशासनाला करोनावर नियंत्रण मिळविणे शक्य होत आहे. तरीही भाजीपाला आणि वैद्यकीय कारणासाठी दिवसांतून वारंवार घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या मोठी असल्याचे पनवेलमध्ये दिसले आहे. गुरुवारपासून पनवेलमध्ये र्निजतुकीकरण फवारणीही करण्यात येत आहे.