पनवेलच्या ब्रह्मा ढोलताशा पथकामधील तरुण सदस्यांनी शहर सुंदर करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. पनवेल रेल्वे स्थानकापासून शहराकडे येताना सिडकोने बांधलेल्या भव्य चौकाला घाणीचे स्वरूप प्राप्त झाल्याने या तरुणांनी या चौकाची शोभा वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणारे प्रवासी या तरुणांच्या कामाचे कौतुक करीत आहेत.
आपले शहर मानणारे तरुण हल्ली मिळत नाही. सरकारी प्रशासनाने सर्वच जबाबदारी पेलाव्यात अशीच अनेकांची अपेक्षा असते. याच्या पलीकडे विचार करून पनवेल शहरातील ब्रह्मा फाऊंडेशनच्या तरुण सदस्यांनी सिडको प्रशासन व सर्वसामान्यांच्या डोळ्यांत अंजन घातले आहे. या चौकातील रोजची दरुगधी सहन करण्यापेक्षा यंदाच्या दिवाळीत हा चौक स्वच्छ करून त्या चौकाची रंगरंगोटी करण्याचे काम हाती घेतले. भर दुपापर्यंत हे तरुण येथे राबले. दिवाळीची महाविद्यालय व विद्यालयांना मिळालेल्या सुटीमध्ये या तरुणांनी हा उपक्रम निवडला. चौकाची रंगरंगोटी करताना या तरुणांनी येथे रेखाटलेली वारली चित्रे सर्व प्रवाशांचे आकर्षण बनले आहे. तसेच पाणीबचतीचे संदेश त्यांनी येथे लिहिले आहेत. जे काम करण्यासाठी सिडको प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी प्रस्ताव, मंजुरी व निविदा यासाठी फायली बनविल्या तरीही हे काम झाले नव्हते. परंतु या तरुणांनी मनाची जिद्द एकवटून दोन दिवसात केलेल्या यशस्वी उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
या उत्साही सदस्यांमध्ये स्वप्निल ठाकूर, चंद्रकांत जाधव, कळंबे काकू, शीतल बागडे, सुमीत जाधव, दिग्विजय बावडे, सतीश गमरे, अंकुश सावंत, रोशन ठाकूर, शशी ओवाळ, शशांक ओवाळ, मधुसूदन तायडे, निरंजन तायडे, प्रफुल्ल लोखंडे, विकास खराडे, घनशाम शिंदे, अक्षय बोबडे, सलीम शेख, सुशांत गमरे, आकाश गावंड, अजय चौधरी, अनिता भुजबळ, राणी मालवणकर, माधुरी गव्हाणकर, मनाली पाटकर, सोनू हांडे, कुलदीप तांबे, निखिल मांडे, विशाल वाघुंडे, ओमकार चौधरी, अनिकेत घारगे, मयूरेश नेतकर, सूरज साप्ते, सौरभ मोळके, मनोज बागडे, सतिष बागडे, दिपकांर बागडे, अनिकेत म्हात्रे, उदीकेत नाईक, निनाद धर्माधिकारी, दीप पाटील, रुपेश पाटील यांचा समावेश होता.
पनवेल शहरामध्ये ढोलताशांची एकूण सहा पथके आहेत. या सर्व पथकांनी दिवाळीच्या मुहूर्तावर ढोलवादनाचे एकत्रित सादरीकरण केले. यामध्ये ब्रह्मा, युवानाद, नादस्फूर्ती, शौर्य प्रतिष्ठान, उत्सव आणि स्वरगर्जना या पथकांचा सहभाग होता. या सर्वानी ९० ढोल, २५ ताशे, २ टोल आणि २ ध्वज यांच्या साह्य़ाने निर्माण केलेले नादब्रह्म अनुभवण्यासाठी पनवेलकरांनी गर्दी केली होती. या तरुणांनी फटाके न वाजविण्याचा केलेला संकल्पही कौतुकाचा विषय ठरला.