कळंबोलीतील सेंट जोसेफ विद्यालयाकडून शिकवणीव्यतिरिक्त शुल्क

पनवेल : सध्या ऑनलाइन शिक्षण सुरू असून शाळा व्यवस्थापनांनी शिकवणी शुल्काव्यतिरिक्त शुल्क घेऊ नये आशा शासनाच्या सूचना आहेत. असे असतानाही काही शाळांकडून शुल्क आकारणी होत आहे. तसेच शुल्क न भरल्याने निकालपत्र दिले जात नाही. या अडवणुकीमुळे पालकांकडून संताप व्यक्त होत आहे. सोमवारी कळंबोली येथील सेंट जोसेफ विद्यालयात पालकांनी धडक देत संताप व्यक्त केला. मुख्याध्यापिकेने हा निर्णय शाळा व्यवस्थापनाचा असल्याचे सांगत हात वर केले.

सेंट जोसेफ विद्यालयाने शिकवणीव्यतिरिक्त संगणक, क्रीडा व इतर शुल्क का भरावे असा प्रश्न नगरसेवक बबन मुकादम यांनी या वेळी उपस्थित केला. काही पालकांनी शुल्क न भरल्याने निकाल दाखवले जात नाहीत आशा तक्रारी मांडल्या.

पालकांच्या या तक्रारी मुख्याध्यापिका रंजना चाफले  ऐकून घेतल्यानंतर दिलेले निवेदन शाळा व्यवस्थापानाकडे पाठवू असे सांगितले. यानंतर निवेदनाचे उत्तर व्यवस्थापनाकडून येईपर्यंत शुल्क न भरलेल्या विद्यार्थ्यांचे निकालपत्र दाखविण्याची मागणी पालकांनी केली. तसेच शिकवणीव्यतिरिक्त शुल्क आकारू नये, अशी मागणी केली. पालकांनी शाळेविरोधात आंदोलनाचा इशाराही दिला आहे.

ऑनलाइन शिक्षणात नेटवर्कअभावी जोडले जात नाहीत त्यांना शिक्षक संपर्क करीत तो विषय पुन्हा समजावून सांगत आहेत. तसेच कोणत्याही शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची वेतन कपात केली नाही. सुमारे २५ टक्के पालकांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे हे आम्हालाही मान्य आहे. विद्यालय व्यवस्थापनाने अशा पालकांना कधीच शुल्क वसुलीसाठी तगादा लावलेला नाही.

– रंजना चाफले, मुख्याध्यापिका, सेंट जोसेफ विद्यालय, कळंबोली