‘एअर शो’मधील करामतींमुळे पनवेलकर थक्क

कर्नाळा स्पोर्टस् अकादमीच्या मैदानात रविवारी पनवेलमधील विद्यार्थी व पालकांनी विमान उडवण्याचा अनुभव घेतला. बॅटरीवर उडणारी विमाने, मोटारच्या साहाय्याने पॅराग्लायडिंग व रिमोट कंट्रोलच्या साहाय्याने उडणारी विमाने पनवेलकरांनी पाहिली. पनवेल रोटरी सेंट्रलने विमान शोधदिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या ‘एअर शो’ला पनवेलकरांची उत्तम प्रतिसाद लाभला.  विमान उडवण्यासाठी धावपट्टी नेमकी कशी असावी, ते आकाशात कोणत्या पद्धतीने झेप घेते, स्थिर होते, वळताना त्याचे पंख किती झुकतात याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. मोटारच्या साहाय्याने पॅराग्लायडिंगचा अनुभव घेण्याची संधी मुलांना मिळाली. पनवेलमध्ये असा उपक्रम प्रथमच राबवण्यात आला होता.

पॅरामोटारीने उडाणारा माणूस

माणसाला हवेत उडवणाऱ्या, आकाशात स्थिर करणाऱ्या १७५ सीसी मोटारचे प्रात्यक्षिक इथे झाले. सव्वा मीटरच्या पंख्याच्या साह्य़ाने जमिनीवर धावून माणूस स्वत उड्डाण घेतो. शंभर फुटांची उंची गाठतो. मुलांना या पॅरामोटारीने उडणाऱ्या माणसाने वेगवेगळ्या पद्धतीने घिरटय़ा घालून चकित केले. रोटरीचे सदस्य योगेंद्र जहागीरदार यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात आला.