वाशीतील ‘सतरा प्लाझा’ येथील दुकानांकडून भररस्त्यात स्वतचे वाहनतळ

नवी मुंबईतील वाढत्या वाहनांसाठी पुरेशी पार्किंग व्यवस्था उभारण्याकडे सिडको, पालिका आणि वाहतूक विभागाने एकत्रितपणे केलेल्या दुर्लक्षाचे परिणाम सध्या शहरात रस्तोरस्ती दिसत आहेत. मॉल आणि व्यावसायिक संकुलांच्या परिसरात रस्त्यांवरील व्ॉलेट पार्किंगमुळे रस्ते ‘गुदमरले’ आहेत. वाशी येथील सतरा प्लाझा हे व्ॉलेट पार्किंगच्या दुष्परिणामांचे बोलके उदाहरण आहे.

शहरात सर्वच विभागांत बेकायदा दुतर्फा पार्किंग करण्यात येते. त्यामुळे समविषम पार्किंगचे नियोजन कोलमडले आहे. मोठे मॉल आणि व्यावसायिक संकुलांपुढे तर पालिका व वाहतूक विभागाने गुडघे टेकले आहेत. नवी मुंबईतील सर्वाधिक वर्दळीचा रस्ता असलेल्या पामबीच मार्गावर सतरा प्लाझा हे व्यावसायिक संकुल आहे. येथे रस्त्याच्या दुतर्फा कायमस्वरूपी बेकायदा पार्किंग केले जाते. सतरा प्लाझामध्ये विविध हॉटेल्स, बँका आणि सराफाची दुकाने आहेत. वाहनांची शोरूम्स, वाहन दुरुस्तीची दुकाने आहेत. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा पार्किंग केले जाते.

सतरा प्लाझासमोर व्ॉलेट पार्किंगची सोय आहे. दुकानदारांनी मुख्य रस्त्यावरच व्ॉलेट पार्किंगचे फलक लावले आहेत. येथे येणारे ग्राहक या पार्किंगचा लाभ घेतात. त्यासाठी पगारी कर्मचारी ठेवण्यात आले आहेत. ते ग्राहकाचे वाहन पार्क करतात आणि त्यांचे काम संपल्यानंतर पुन्हा त्याच ठिकाणी ते वाहन आणून देतात. पण मुळातच सतरा प्लाझामध्ये पार्किंगसाठी पुरेशी जागा नाही. त्यामुळे पार्किंग करणारे कर्मचारी रस्त्याच्या दुतर्फा वाट्टेल तिथे वाहने पार्क करतात. त्यामुळे वाहतुकीचे पुरते बारा वाजले आहेत. सतरा प्लाझा समोर नो-पार्किंगचे फलक लावलेले असूनही तिथे बिनधास्त पार्किंग केले जात आहे. महापालिका व वाहतूक विभाग मात्र डोळे मिटून बसले आहेत.

इथे तीन मार्गिका आहे. त्यांपैकी दोन मार्गिकांवर बेकायदा पार्किंग होते आणि फक्त एकच मार्गिका वाहतुकीसाठी शिल्लक राहते. त्यामुळे या भागात कायमची वाहतूक कोंडी असते. त्यामुळे या परिसरात मोठी दुर्घटना घडल्यास जबाबदार कोणाला धरायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे. शहराचा विकास वेगाने होत असताना पार्किंगच्या उडालेल्या बोजवाऱ्यामुळे रस्त्यांवर वाहने चालवण्यासाठी जागाच उरलेली नाही. रस्ते वाहतुकीपेक्षा पार्किंगनेच व्यापलेले दिसत आहेत.

जागा दिसेल तिथे पार्किंग

पार्किंगसाठी सिडकोने पालिकेकडे भूखंड हस्तांतरित करावे, अशी मागणी पालिकेने केली आहे. सिडकोकडून हस्तांतरीत होणाऱ्या भूखंडांपैकी काही भूखंडावर पार्किंगची व्यवस्था होईपर्यंत रस्त्यावरील कोंडी फुटणे कठीण आहे.

सतरा प्लाझासमोर बेकायदा पार्किंग केले जाते. दोन दोन मार्गिकांवर पार्किंग होत असल्याने वाहतुकीसाठी जागाच शिल्लक राहत नाही. वाहतूक पोलीस विभागाला कारवाईबाबत वारंवार सूचना दिल्या आहेत. त्यांनी सातत्याने कडक कारवाई केली पाहिजे. पालिकाही पार्किंग नियोजनाबाबत योग्य विचारविनिमय करत आहे. लवकरात लवकर शहरात जास्तीत जास्त ठिकाणी ही व्यवस्था करण्याचा प्रयत्न आहे.

अंकुश चव्हाण, अतिरिक्त आयुक्त, नवी मुंबई महापालिका

सतरा प्लाझासमोर व्ॉलेट पार्किंगच्या नावाखाली हवी तिथे वाहने पार्क केली जात आहेत. रस्त्यावरचे व्ॉलेट पार्किंगचे बोर्ड हटविण्यात येतील. येथील दोन मार्गिकांवर पार्किंग केले जाते. तसे होऊ नये म्हणून योग्य ती खबरदारी घेतली जाईल.

मच्छिंद्र खाडे, वरिष्ठ वाहतूक निरीक्षक, एपीएमसी

आमच्या दुकानात येणाऱ्या ग्राहकांची वाहने जागा असेल सतरा प्लाझामध्ये पार्क करतो, अन्यथा जिथे जागा मिळेल तिथे पार्क करण्याशिवाय पर्याय राहत नाही. आम्हाला दुकानदारांनी व्ॉलेट पार्किंग करण्यासाठी नेमले आहे. त्यामुळे आम्ही दुकानमालकांच्या हुकमाचे शिलेदार आहोत.

किशोर आव्हाड, पार्किंग कर्मचारी

नवी मुंबई महापालिकेला सिडकोकडून पार्किंग सुविधेसाठी १२ भूखंड व रस्त्यालगतच्या ३८ मोकळ्या जागा हस्तांतरित करण्यात आल्या आहेत. पार्किंगच्या सुविधेबाबत लवकरात लवकर कार्यवाही करण्याबाबत प्रशासन प्रयत्नशील आहे.

दादासाहेब चाबूकस्वार, उपायुक्त