वाहनतळ धोरण नसल्याने जागा मिळेल तिथे वाहने उभी

सीमा भोईर, पनवेल</strong>

पनवेल महापालिकेला दोन वर्षे झाली तरी शहरातील वाहनतळासंदर्भात पालिकेचे अद्याप काहीच धोरण न ठरल्यामुळे जागा मिळेल तिथे वाहने लावली जात आहेत. परिणामी शहरात वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे. चौकातून रस्ता शोधत बाहरे पडणे अवघड झाले आहे. हे चित्र नेहमीचेच झाले आहे.

तालुक्याचे मुख्य ठिकाण व मोठी बाजारपेठ असल्याने शहरात खरेदी विक्रीसाठी ग्रामीण भागासह शहरातील अनेक लोक येत असतात. रुग्णालये, शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये, बाजारपेठ पनवेलमध्ये असल्याने शहरात दिवसभर वाहनांची मोठी वर्दळ असते. मात्र वाहने कुठे पार्किंग करावी हा वाहनचालकांसमोर मोठा प्रश्न असतो. कोळीवाडा येथे दुचाकीसाठी एक वाहनतळ आहे, मात्र त्याची मर्यादा ही ७० ते ८० वाहनांची आहे. त्यामुळे वाहनचालक बाजारपेठेत वाहन लावण्यासाठी जागा शोधत चकरा मारत बसतात. जिथे जागा मिळेल तिथे वाहने लावली जातात. कधी एकेरी तर कधी दुहेरीही वाहनं लावली जातात. आधीच रस्ते अपुरे त्यातवाहनं रस्त्यावर लावल्यामुळे अर्धा रस्ता तर जाम होतो. त्यात काही ठिकाणी फेरीवाल्यांचे ‘दुकान’ही मांडलेले असते. परिणामी शहरात वाहतूक कोंडी होत असते. हे चित्र नेहमीचेच असते. मग सुरू होतो वाहनांचा कर्णकर्कश आवाज. हॉन वाजवत यातून मार्ग काढत कसेतरी कोंडीतून बाहेर यावे लागते. मग सुटकारा सोडत वाहनचालक मार्गस्थ होतो.

निमुळत्या अंतर्गत रस्त्याच्या दुतर्फा केली जाणारी बेकायदा पार्किंग ही पनवेल शहराची मोठी समस्या झाली आहे. पूर्वी असणाऱ्या वाडय़ांचे रूपांतर आता इमारतीत झाले आहे.

मात्र काहीच इमारतींत पार्किंगची व्यवस्था आहे. त्यामुळे त्यांची वाहनही रस्त्यावर असतात. त्यामुळे वाहनतळासाठी काही तरी धोरण ठरवणे ही मोठी गरज आहे. असे असताना पालिकेकडे अद्याप कोणतेही धोरण दिसत नाही.

मध्यंतरी ‘पे अ‍ॅण्ड पार्क’ संदर्भात चर्चा सुरू झाली होती. तसा प्रस्ताव तयार करण्याचे ठरविले जात होते. मात्र या संदर्भातही पुढे काही झाले नाही.

पूर्वीच्या तुलनेत येथील वाहनांची संख्या आता दुप्पट झाली आहे. त्यामुळे वाहनतळांची शहराला मोठी गरज आहे. तसे झाल्यास अंतर्गत रस्त्यावर होत असलेली दुतर्फा पार्किंग कमी होईल. रस्ते मोकळे होतील आणि वाहतूक कोंडीतून काहीसा दिलासा मिळेल, असे पनवेलकरांचेही म्हणणे आहे.

या संदर्भात पालिका प्रशासनाला विचारणा केली असता, त्यांचे उत्तर ठरलेले असते, शहरातील पार्किंगचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. बीओटी तत्वावर वाहनतळ उभारण्यात येणार आहे. पण पुढे काहीच होताना दिसत नाही.