प्रदूषण होत असल्याची रहिवाशांची तक्रार

नवी मुंबई नवी मुंबईतील पूर्व बाजूस असलेल्या पारसिक डोंगराच्या कुशीत असलेल्या वन क्षेत्रातील सर्व दगड खाणींचे वन विभाग ड्रोनच्या साह्य़ाने सर्वेक्षण करणार आहे. पारसिक डोंगर आता पोखरणे थांबवा आणि या डोंगराला हेरिटेजचा दर्जा जाहीर करण्यात यावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.

नवी मुंबई शहर वसविताना बांधकामासाठी लागणारे साहित्य याच ठिकाणी उपलब्ध होऊन बांधकाम खर्च कमी व्हावा यासाठी सिडकोने पारसिक डोंगरातील काही जमिनी दगड खाणीसाठी भाडेपट्टय़ावर दिलेल्या आहेत. वन, महसूल आणि सिडको हद्दीत असलेल्या सुमारे दोनशे दगडखाणी सध्या बंद आहेत, मात्र गेली अनेक वर्षे पारसिक डोंगर पोखरून यातून कोटय़वधी टन दगड, खाडी उत्खनन करण्यात आलेली आहे. याच दगडखाणींवर काम करणाऱ्या मजुरांमुळे पावणे, शिरवणे, कुकशेत, बोनसरी आणि तुर्भे येथे मजुरांच्या वसाहती निर्माण झालेल्या आहेत. काही ठिकाणी या दगड खाणी सुरू होण्या अगोदरच गावांचे अस्तित्व असल्याची नोंद आहे. १३८ हेक्टर जमिनीवर पसरलेल्या वन विभाग क्षेत्रातील दगड खाणींचे वन विभाग ड्रोनच्या साह्य़ाने सर्वेक्षण करणार आहे. दिघ्यापासून शिरवणे गावापर्यंत या दगड खाणीमुळे डोंगर पोखरण्यात आल्याने ते ओसाड वाटत आहेत. प्रारंभी प्रकल्पग्रस्तांना देण्यात आलेल्या या दगड खाणी नंतर भाडेतत्त्वावर व्यवसायिकांनी घेतलेल्या आहेत. या दगड खाणींमुळे शहरात मोठय़ा प्रमाणात प्रदूषण निर्माण होत असल्याच्या तक्रारी अनेक पर्यावरण संस्थांनी केलेल्या आहेत. या संदर्भात याच क्षेत्रात राहणाऱ्या एका रहिवाशाने जनहित याचिका हरित लवादाकडे दाखल केली आहे.

रायगडकडे मोर्चा

अनेक दगड खाण मालकांनी आपला गाशा रायगड जिल्ह्य़ातील काही ग्रामीण भागात वळविला आहे. त्यामुळे या सर्व दगड खाणी बंद करून या डोंगराला हेरिटेज दर्जा जाहीर करण्यात यावा, अशी मागणी नागरिक व सामाजिक संस्थांनी केली आहे.