विकास महाडिक

विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत कोकणात पक्ष संघटना कमकुवत का, असा सवाल करीत आगामी विधानसभा निवडणुकीत कोकणात चांगले यश मिळून आमदारांचे संख्याबळ वाढलेच पाहिजे, अशा शब्दांत भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादव यांनी कोकणातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची कानउघाडणी केली.

जे. पी. नड्डा व यादव यांच्या उपस्थितीत रविवारी ठाणे व कोकण विभागातील सर्व पदाधिकारी, खासदार, आमदार यांची एक बैठक जुन्या पनवेलमधील विरुपाक्ष सभाृहात आयोजित करण्यात आली होती. ठाणे व कोकणातून पक्षाचे ८०० पेक्षा जास्त निमंत्रित पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. राज्याचा दौरा करताना कोकणची विशेष काळजी घेण्याचा सल्ला अनेकांनी दिल्याचे नड्डा यांनी स्पष्ट केले. ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या कोकणातील चार जिल्ह्य़ांत एकूण ३९ आमदारांपैकीभाजपचे १० आमदार आहेत. ही संख्या या निवडणुकीत वाढली पाहिजे, असे नड्डा यांनी पदाधिकाऱ्यांना बजावले. त्यासाठी लागणारी कोणत्याही प्रकारची रसद पुरविण्याचे आश्वासन त्यांनी दिले. सर्वाना पदाधिकारी व्हायचे असून बुथ कार्यकत्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याबद्दल त्यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली. कोकणातील ज्या बुथमध्ये भाजपा कमकुवत आहे, तेथील मतदारांची माहिती पक्ष नेतृत्वाला देण्याच्या सूचना त्यांनी केल्या.  या निवडणुकीत

जम्मू आणि काश्मीरला असलेले विशेषाधिकार रद्द करणे,  आयुष्यमान भारत योजना आणि तिहेरी तलाक या विषयांवर जनतेशी संवाद साधण्याचा सल्ला या दोन  नेत्यांनी दिला.

कोकणात भाजपचे दहा तर सेनेचे चौदा आमदार

ठाण्यासह कोकणात शिवसेनेच्या आमदारांचे संख्याबळ जास्त आहे. ठाण्यासह कोकणात गेल्या वेळी शिवसेनेचे १४ तर भाजपाचे १० आमदार निवडून आलेले आहेत. काँग्रेसचा केवळ एक आमदार असून आठ आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत तर सहा जण इतर प्रादेशिक पक्षांचे आहेत. त्यामुळे विदर्भ मराठवाडय़ापेक्षा कमी संख्याबळ असलेल्या कोकणात शिवसेनेला शह देण्यासाठी आमदारांची संख्या वाढविण्याचा आदेश पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने पदाधिकाऱ्यांना दिला.