सीवूड्स रेल्वेस्थानकात उपद्रव, सुरक्षारक्षकांचे दुर्लक्ष

सीवूड्स रेल्वे स्थानक आणि परिसरातील भिकाऱ्यांचा वाढता वावर प्रवाशांसाठी मोठी डोकेदुखी ठरू लागला आहे. प्रवाशांना अडवून पैसे मागितले जात असल्यामुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत. सिडकोचे सुरक्षारक्षक व रेल्वे सुरक्षा दलाचे पोलीस यांचेही त्यांच्याकडे दुर्लक्ष होत आहे.

नवी मुंबईतील रेल्वे स्थानके, बस थांबे, उद्याने आणि वर्दळीच्या चौकांत भिकारी बसलेले दिसतात. सीवुड्स स्थानकात ही समस्या गंभीर झाली आहे. भिकारी आणि त्यांच्यासोबत असणारी लहान मुले प्रवाशांना प्रवेशद्वारावरच अडवतात. त्यामुळे कार्यालय गाठण्याच्या घाईत असलेल्या प्रवाशांना विलंब होतो. हे भिकारी प्रवाशांचे कपडे पकडणे, हात पकडणे, पाया पडणे असे प्रकार करतात आणि पैसे देण्यास भाग पाडतात. स्थानकात तिकीटघराजवळही असाच प्रकार सुरू असतो. संध्याकाळी कार्यालयातून घरी जाणाऱ्या प्रवाशांचा स्थानकाबाहेरील बसस्थानक व रिक्षाथांब्यापर्यंत पिच्छा पुरवला जातो. रेल्वे स्थानक आणि परिसरातील अस्वच्छता आणि दुर्गंधीलाही हे भिकारी कारण ठरत आहेत. पहाटे स्थानकांत येणाऱ्यांना या अस्वच्छतेचा सामना करावा लागतो.

स्थानकातील वावर नसलेले फलाट म्हणजे भिकाऱ्यांचे घरच बनले आहेत.

फलाट क्रमांक २ वर छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या दिशेने जातात शेवटच्या डब्याजवळ भिकाऱ्यांनी बस्तान बसवले आहे. रात्री ते तिथेच झोपतात. त्यामुळे प्रवाशांना असुरक्षित वाटते. या भिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

नेरुळ, सीवूड्स स्थानकात व स्थानकातील सिडकोच्या जागेत फेरीवाले व भिकाऱ्यांचा वावर वाढला आहे. ते प्रवाशांना स्थानकात प्रवेशही करू देत नाहीत. घरी जाताना बस किंवा रिक्षात बसेपर्यंत पाठलाग करतात. सिडकोचे सुरक्षारक्षक व रेल्वे जीआरपी यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. काही अनुचित प्रकार घडल्यास जबाबदार कोण?

– नितीन मुळीक, रेल्वेप्रवासी, सीवुड्स

नेरुळ आणि सीवूड्स रेल्वेस्थानकांत सिडकोचे प्रत्येकी १२ सुरक्षारक्षक आहेत. स्थानकातील भिकाऱ्यांवरील कारवाईबाबत सुरक्षारक्षकांना विचारण्यात येईल. तसेच तात्काळ त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात येतील.

– वाय. व्ही. गायकवाड, मुख्य सुरक्षारक्षक अधिकारी, सिडको