05 August 2020

News Flash

पार्किंगच्या गोंधळामुळे प्रवासी त्रस्त

कोपर खैरणेरेल्वे स्थानकातील वाहनतळावर ठेकेदाराकडून मनमानी शुल्कआकारणी

कोपर खैरणेरेल्वे स्थानकातील वाहनतळावर ठेकेदाराकडून मनमानी शुल्कआकारणी

नवी मुंबई : कोपर खैरणे रेल्वे स्थानक परिसरात सिडकोमार्फत सशुल्क वाहनतळ ठेका देण्यात आला असला तरीही ठेकेदार नेमके कसे काम करतात याकडे सिडकोचे दुर्लक्ष होत असल्याचे आरोप होत आहेत. या ठिकाणी लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी वाहने उभी करणे अपेक्षित असले तरीही टेम्पो, रिक्षा, फेरीवाल्यांच्या गाडय़ांना पार्किंगसाठी जागा देण्यात येत आहे. अशा नियमबाह्य पद्धतीने वाहन पार्किंग करून प्रवाशांना मात्र पार्किंग सुविधेपासून वंचित राहावे लागत आहे.

कोपर खैरणे रेल्वे स्थानक रस्त्यांवर वाहने उभी राहात असल्यामुळे मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी होते. नियोजित रिक्षातळ असलेल्या जागेवर देखील दुचाकी लावून ठेकेदार वसुली करत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे. निश्चित दरापेक्षा अधिक दराने वाहनतळाच्या बाहेरच्या जागेत ठेकेदार बिनधास्त वाहनाचे पैसे आकारत आहे. सिडकोने ठेका देताना शेड उभारण्यास मनाई केली असताना या ठिकाणी मोठी शेड टाकून कामगारांना राहण्याची सुविधाही देण्यात आली आहे. सिडकोने ठेका दिलेल्या जागेत रिक्षा चालकांकडून अवजड वाहनांना ठरावीक रक्कम आकारून अनेक महिन्यांपासून पार्किंगची सुविधा दिली असल्याने प्रवाशांना रेल्वेस्थानक आवारात मोकळ्या जागेत वाहने उभी करावी लागत आहेत.

ठेकेदारांचा फलक लावलेल्या प्रवेशद्वाराच्या मोकळ्या जागेत देखील नियमबाह्य पद्धतीने वाहने उभी करून वसुली केली जात आहे. सिडकोमार्फत ले आऊट देऊन पार्किंगची जागा निश्चित करताना सर्व नियम करारात नमूद करते. या करारातील सर्वच अटी-शर्ती आणि नियमांचे ठेकेदाराकडून कुठेही पालन होताना दिसत नाही. वाहनतळाच्या डाव्या बाजूस अनेक महिन्यांपासून विशिष्ट वाहनांना जागा देऊन टाकल्याने नियमित वाहनांना जागाच नसते. याशिवाय फेरीवाल्यांचीही उपस्थिती या जागेत दिसून येत आहे. या वाहनतळ परिसरात दुधाची वाहने, रसविक्रेत्यांची वाहने लावली जात आहेत. जवळपास ठेकेदारांच्या कृपेने सशुल्क वाहनतळाचा ताबा रिक्षा आणि व्यावसायिक वाहनांनी घेतला असून ही सर्व वाहने धूळखात पडली आहेत. वाहतूक पोलिसांनी तसेच पर्यावरण संस्थांनी देखील याबाबत सिडकोशी पत्रव्यवहार केला आहे.

नागरिकांकडून दामदुप्पट वसुली

या ठिकाणी तैनात असलेल्या कर्मचाऱ्याने गणवेश आणि ओळखपत्र घालणे आवश्यक असताना हा कर्मचारी पावती पुस्तक घेऊन येतो. मात्र त्याच्याकडे गणवेश आणि ओळखपत्र नसते, अशी माहिती अरविंद जाधव या प्रवाशाने दिली. तसेच सिडकोने ठेका दिलेल्या जागेच्या बाहेर हा कर्मचारी रेल्वेच्या मोकळ्या जागेत वसुली करतो. सिडकोने ठरवून दिलेला दर प्रति चार तासांसाठी दहा रुपये असताना बाहेरच्या जागेत सरसकट वीस रुपये आकारले जात आहे. पावतीवरील नोंद देखील चुकीच्या पद्धतीने केली जाते.

कोपर खैरणे रेल्वे स्थानक परिसरातील वाहनतळाची प्रत्यक्ष पाहणी करून योग्य ती कारवाई केली जाईल.

– प्रियांका रातांबे, जनसंपर्क अधिकारी (सिडको)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2020 4:06 am

Web Title: passengers suffer due to parking confusion zws 70
Next Stories
1 दक्षिण नवी मुंबई सिडकोच्या रडारवर
2 पनवेल पालिका पोटनिवडणुकीत भाजपचा विजय
3 फेब्रुवारीपासून प्रवासी जलवाहतूक
Just Now!
X