वाशी डेपोतील खड्डय़ांमुळे प्रवाशांचे हाल

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवी मुंबई शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या वाशी डेपोची खड्डय़ांमुळे दुर्दशा झाली आहे. पावसाचे पाणी खड्डय़ांत साचल्यामुळे बसचालक प्रवाशांना त्रास होत आहे. शिवाय खड्डय़ातून गाडी गेल्यानंतर बसची वाट पाहणाऱ्यांच्या अंगावरही पाणी उडत आहे. एवढी दयनीय अवस्था होऊनही अद्याप डागडुजी सुरू करण्यात न आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. डेपोतील पदपथांवर शेवाळे उगवल्याने प्रवासी घसरून पडण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे इकडे डबके, तिकडे शेवाळ अशा स्थितीत बसची प्रतीक्षा करणाऱ्यांचे हाल होत आहेत.

वाशी डेपोतून रोज किमान ३०० गाडय़ांची ये-जा होते. त्यात एनएमएमटी आणि बेस्ट बसचे प्रमाण जास्त असते. कल्याण-डोंबिवली पालिका तसेच खोपोली नगर परिषदेच्या परिवहन सेवांच्या बसगाडय़ा तसेच राज्य परिवहनच्या (एसटी) गाडय़ाही येथून ये-जा करतात. डेपो मोक्याच्या जागी असल्याने ते प्रवाशांसाठी सोयीस्कर ठरते. त्यामुळे येथे प्रवाशांची गर्दीही मोठय़ा प्रमाणात असते. सध्या मात्र पावसाने या डेपोची दयनीय अवस्था झाली आहे.

डेपोत कुठेही चालणे जिकिरीचे झाले आहे. डेपोतील पदपथावर शेवाळ उगवले आहे. अनेक प्रवासी घसरून पडत आहेत. बस थांब्यावर उभे राहिल्याशिवाय पर्याय नाही आणि तिथे उभे राहिल्यानंतर बस खड्डय़ांतून गेली की कपडय़ांवर चिखल उडणार हे निश्चित अशी स्थिती आहे. पनवेलकडे जाणाऱ्या गाडय़ा ज्या ठिकाणी थांबतात तिथेच एक भला मोठा खड्डा पडला आहे. त्यात वारंवार खडी टाकली जात आहे, मात्र काही तासांत परिस्थिती जैसे थे होत आहे. जुलै संपत आला तरी डागडुजीलाही सुरुवातही झालेली नाही.

रोज मरे त्याला कोण रडे, अशी अवस्था आहे. दर वर्षी पावसाळा आला की हीच अवस्था होते. कंत्राटदार अधिकारी आणि राजकीय व्यक्तींसाठी हा काळ सुगीचा असतो. दरवर्षी उद्भवणाऱ्या या समस्येवर कायमस्वरूपी उपाय काढणे आवश्यक आहे. 

– मच्छिंद्र कदम, प्रवासी

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Passengers suffer due to potholes in vashi depot
First published on: 21-07-2018 at 02:44 IST