मुंबई-गोवा मार्गावर वाहनचालकांना मनस्ताप

नवी मुंबई शनिवार, रविवार सलग सुट्टय़ांमुळे पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांना मनस्तापाला सामोरे जावे लागले. शीव-पनवेल महामार्गाचे सुरू असलेले काँक्रीटीकरण व मुंबई-गोवा महामार्गाचे जागोजागी सुरू असलेले काम यामुळे तासन्तास रखडपट्टी करावी लागली.

अलिबाग, मुरुड, गोवा तसेच महाबळेश्वर, पाचगणी, लोणावळा या ठिकाणांहून रविवारी परतणाऱ्या प्रवाशांना या सर्वच मार्गावर वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले. मुंबई-गोवा महामार्गावर प्रवास नको रे बाबा, असा सूर पर्यटकांमध्ये दिसत होता.

मुंबई व परिसराच्या विविध उपनगरांतून पर्यटनाला जाणाऱ्यांची संख्या मोठी असते. शुक्रवारी संध्याकाळपासूनच बाहेरगावी जाणाऱ्या वाहनांमुळे शीव-पनवेल महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी होती. तर अलिबाग व कोकणाकडे जाणाऱ्या प्रवाशांना मुंबई-गोवा महामार्गाच्या रस्त्यांच्या कामांमुळे अधिक मनस्ताप सहन करावा लागला. पनवेलवरून कर्नाळा खिंड व त्यापुढे पळस्पे फाटा, पेण, वडखळ नाका या ठिकाणी वाहनांच्या रविवारी संध्याकाळी रांगाच रांगा पाहायला मिळाल्या. वडखळमध्ये सातत्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी या मार्गावर वडखळबाहेरूनच तयार करण्यात येत असलेल्या उड्डाणपुलामुळे वाहनांचा चांगलाच खोळंबा झाला. पेण शहराजवळ सुरू असलेल्या कामामुळे वाहतूक पोलिसांना चांगलीच कसरत करावी लागली. पेण परिसरातही वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे मुंबईत परतणाऱ्या प्रवाशांचे चांगलेच हाल झाले. काही वाहने विरुद्ध दिशेने येत असल्यामुळे अधिकच वाहतूक कोंडी झाली होती.

अलिबागवरून संध्याकाळी नवी मुंबईत परतताना मुंबई-गोवा मार्गावर मोठी वाहतूक कोंडी होती. त्यामुळे तीन ते चार तास प्रवास उशिराने झाला. या मार्गावरील रस्त्याची कामे अत्यंत धिम्या गतीने व विविध ठिकाणी सुरू आहेत. त्यामुळे वाहतूक पोलिसांचीही मोठी अडचण होत आहे. या मार्गाचे काम लवकरात लवकर झाले तरच गोवा, अलिबागला जाणे सोयीचे होणार आहे.

-प्रीतम पवार, ऐरोली

मुंबई-गोवा महामार्गावर रस्त्यांची मोठय़ा प्रमाणात कामे सुरू आहेत. त्यामुळे पेण, तारागाव, रामवाडी, वाशी फाटा येथे वाहतूक कोंडी होत आहे. वडखळ परिसरात उड्डाणपुलाचे काम सुरू असल्यानेही तेथेही वाहतूक कोंडी होते.

– राजीव बयकर, वाहतूक विभाग खारपाडा