विकास महाडिक

मुंबईत दररोज प्रवास करणारे शासकीय तसेच वैद्यकीय कर्मचारी, दीड महिना सुरू ठेवण्यात आलेली एपीएमसी बाजारपेठ, पालिका अधिकाऱ्यामधील समन्वयाचा अभाव, अनुभवी डॉक्टरांची कमतरता अशा अनेक कारणांमुळे नवी मुंबईत करोना रुग्णांचा आकडा हजाराच्यावर पोहोचला आहे.

आठवडाभर बंद असलेली एपीएमसी बाजारपेठ सोमवारपासून पुन्हा सुरू करण्यात आल्याने ही संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. केवळ एपीएमसी बाजारात काम करणाऱ्यांमध्ये ४०० जणांना लागण झाली आहे. एपीएमसीचे संपूर्ण निर्जंतुकीकरण करण्यात येत असून ही संख्या आटोक्यात येईल, असा विश्वास कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौंड यांनी व्यक्त केला आहे. घरीच विलगीकरण केलेल्या नागरिकांची संख्या दहा हजारांच्या घरात आहे. वाढती रुग्णसंख्या केंद्रीय आरोग्य पथकालाही आश्चर्यचकित करणारी आहे. या पथकाने तीन वेळा नवी मुंबईला भेट दिली आहे.

५५० खाटा तयार ठेवण्याचे आदेश

वाशी येथील सिडकोच्या प्रदर्शन केंद्रात एक हजार खाटांचे विशेष कोविड रुग्णालय उभारले जात आहे. अत्यवस्थ असलेल्या रुग्णांसाठी पालिकेने आतापर्यंत केवळ २५० खाटा तयार ठेवलेल्या आहेत. शहरातील नऊ खासगी रुग्णालयांना कोविड रुग्णांसाठी ५५० खाटा तयार ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.