तेरणा रुग्णालयात पाच जणांवर उपचार; पालिकेकडे अद्याप नोंद नाही

नवी मुंबई : करोनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराचे प्रमाण वाढले असून नवी मुंबईतही गेल्या महिनाभरात या आजाराची लक्षणे आढळलेल्या पाच रुग्णांवर उपचार करण्यात आल्याची माहिती नेरुळ येथील तेरणा रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली. नवी मुंबई महापालिका प्रशासनाने शहरात अद्याप अशा रुग्णांची नोंद झाली नसल्याचे म्हटले असले तरी करोनामुक्त झालेल्या रुग्णांनी पुढील १५ दिवस काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे.

करोनाची लागण झालेल्या रुग्णांतील प्रतिकारशक्ती कमी होते. त्यातच रुग्णांना मधुमेह किंवा मूत्रपिंडाशी संबंधित आजार असतील तर त्यांना म्युकरमायकोसिसची लागण होत असल्याचे निदर्शनास येत आहे. या आजारात नाकाच्या बाजूला असलेल्या हाडाच्या मोकळ्या जागेत (सायनस) या बुरशीची वाढ होते व त्या व्यक्तीची प्रतिकारशक्ती कमी असेल तर ही बुरशी वेगाने वाढते व पुढे रक्तवाहिन्यांमध्ये शिरून रक्तप्रवाहात अडथळा आणते. करोनाच्या पहिल्या लाटेवेळी या आजाराबाबतची माहिती समोर आली होती. मात्र, करोनाच्या दुसऱ्या लाटेत या आजाराने अनेकांची दृष्टीच हिरावून घेतली आहे. त्यामुळे करोनामुक्त झालेल्या रुग्णांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. नवी मुंबईतील तेरणा रुग्णालयात अशा प्रकारच्या पाच रुग्णांवर उपचार करण्यात आल्याची माहिती या रुग्णालयातील मॅक्सिलोफेशियलतज्ज्ञ डॉ. विनीत अडवाणी यांनी सांगितले. ही लक्षणे प्राथमिक अवस्थेत असताना त्यावर उपचार करणे शक्य असते. मात्र, डोळ्यात, मेंदूमध्ये फैलाव झाल्यास उपचार करणे धोक्याचे होते, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी बुरशीजन्य आजाराचा एकही रुग्ण आढळला नसल्याचे किंवा त्याच्या उपचाराबाबत विचारणा झाली नसल्याचे स्पष्ट केले. ‘करोनाबाधित आजारातून मुक्त झाल्यानंतर पुढील १५ दिवस पालिकेच्या कोविड कॉल सेंटरमधून रुग्णांच्या आरोग्याची माहिती घेतली जाते. रुग्णांनीदेखील आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी,’ असे आवाहन आयुक्तांनी केले.