नवी मुंबईतील पदपथांची दुर्दशा; पार्किंग, फेरीवाल्यांचे अतिक्रमण

चालण्यासाठी पदपथांचा वापर करावा, असे शाळेत असल्यापासून शिकवले जात असले, तरीही नवी मुंबईत मात्र असे करणे घातक ठरत आहे. पायाखालची जमीन कधी सरकेल याचा नेम नसल्याचा अनुभव नवी मुंबईकरांना येत आहे. जुईनगर सेक्टर २५ येथील एक पदपथ फुटून पादचारी थेट गटारात पडल्याची घटना रविवारी घडली. अन्यत्रही पदपथांवरचे पेव्हर ब्लॉक उखडल्यामुळे चालताना ठेच लागणे, मॅनहोलची झाकणे खिळखिळी होणे, झाडांच्या फांद्या पडलेल्या असणे, पदपथांवर पार्किंग आणि फेरीवाले असणे अशा समस्या शहरभर आहेत. त्यामुळे नवी मुंबईकरांसाठी पदपथ गैरसोयीचे ठरत आहेत. पालिका मात्र उंदीर-घुशींनी पदपथ पोखरल्याचे सांगून हात वर करत आहे.

जुईनगर सेक्टर २५ येथील भारत सोसायटीसमोरील परिसरात पदपथाचे काम करून त्यावर पेव्हर ब्लॉक बसवले आहे. तिथेच गटारांची झाकणेही आहेत. रविवारी एक पादचारी तेथून जात असताना, पदपथ फुटला आणि पादचारी थेट गटरात पडून जखमी झाला. सोसायटीच्या सुरक्षारक्षकांनी प्रसंगावधन राखत त्याचा जीव वाचवला; मात्र त्यामुळे पदपथावरून चालावे की नाही, याविषयी रहिवाशांत साशंकता निर्माण झाली आहे. पदपथाचे काम योग्य पद्धतीने झालेले नाही, शिवाय साहित्यही निकृष्ट दर्जाचे वापरण्यात आले, त्यामुळे हा अपघात घडल्याचा आरोप येथील रहिवासी रवींद्र सांवत यांनी केला. दोन वर्षांपूर्वी ऐरोली येथेही गटाराचे झाकण तुटून पादचारी गंभीर जखमी झाला होता. अनेक ठिकाणी पदपथ खचले आहेत.

चालायचे कुठून?

पदपथ एक तर वापरायोग्यच नसतात, असतील तर त्यावर फेरीवाले असतात. त्यामुळे रस्त्याच्या कडेने चालायला जावे, तर अनधिकृत पार्किंने साधारण अर्धा रस्ता व्यापलेला असतो. त्यामुळे नेमके चालायचे कुठून, असा प्रश्न पादचाऱ्यांना पडत आहे. त्यामुळे जीव मुठीत धरून वाहने, खड्डे चुकवत रस्त्यावरूनच मार्गक्रमण करावे लागते. पावसाळ्यामुळे ये-जा करणाऱ्या वाहनांमुळे कपडय़ांवर चिखल उडतो. शिवाय, या स्थितीचा फायदा सोनसाखळी चोरही घेतात.

पदपथांवरील पेव्हर ब्लॉक काढण्यात येणार असून त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. पदपथावरील गटारांची झाकणे गुर्दल्ले तोडतात. काही वेळा साफसफाईसाठी काढण्यात आलेली गटारांची झाकणे पुन्हा नीट बसवली जात नाहीत. त्यामुळे ती फुटतात आणि अपघात होतात. उंदीर-घुशीही पदपथ पोखरतात आणि त्यामुळे खड्डे पडणे, खचणे असे प्रकार घडतात. पालिका यावर योग्य ती कार्यवाही करेल.

– सुभाष सोनवणे, कार्यकारी अभियंता, नवी मुंबई महानगर पालिका

अतिक्रमणे-

* वाशी सेक्टर ९ व एपीएमसीमधील पदपथांवर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले असून सायंकाळी येथून चालणे अशक्य होत आहे.

* मथाडी भवन परिसरात दुकानदारांनी पदपथांवर अतिक्रमण केले आहे.

* मसाला मार्केटजवळील सेवा रस्त्यावरील पदपथावर भाजी व फळ विक्रेत्यांनी बस्तान मांडले आहे.

* कोपरी गाव येथे पदपथावर वाहने उभे केली जात आहेत.

* ऐरोली रेल्वे स्थानक परिसरात पदपथावर अनाधिकृत रिक्षा थांबा आहे.

* वाशी रुग्णालयाजवळील पदपथावर दुचाकी वाहने पार्क केली जातात.

*  नेरुळ रेल्वे स्थानकासमोरचा पूर्ण पदपथ सायंकाळी भाजी व मासे विक्रेत्यांनी व्यापलेला असतो.

* नेरुळ सेक्टर २० मध्ये गॅरेज, हॉटेल व मटण विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. तुभ्रे नाका पदपथ मटण विक्रेत्यांनी गिळंकृत केला आहे.

*  कोपरी येथे कार व्यावसायिकांनी पदपथावर कब्जा केला आहे.

*  रबाळे रेल्वे स्थानकासमोरील भुयारी मार्गाजवळील पदपथावर फेरीवाल्यांनी आपले बस्तान मांडले आहे.