सामाजिक संस्थांना धार्मिक व आध्यात्मिक स्थळ उभारण्यासाठी अधिकृत भूखंड देताना बेकायदेशीर धार्मिक स्थळांवर कारवाई करण्याचे संकेत सिडकोने दिले आहेत. नियोजन विभागाकडून बेकायदेशीर धार्मिक स्थळांची अंतिम यादी आल्यानंतर येत्या महिनाअखेर या बांधकामांवर कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. नवी मुंबई, पनवेल, उरण भागात एकूण ४६७ बेकायदेशीर धार्मिक स्थळे असून त्यातील काही स्थलांतरित केली जाणार आहेत.
राज्यातील बेकायदेशीर धार्मिक स्थळांवर कारवाई करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दोन महिन्यांपूर्वी दिले आहेत. ही कारवाई येत्या नऊ महिन्यांत केली जाणार असून स्थानिक प्राधिकरण त्यासाठी कामाला लागले आहेत. यात सप्टेंबर २००९ पूर्वीच्या बेकायदेशीर धार्मिक स्थळांना अभय दिले जाणार आहे. त्यातील वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या धार्मिक स्थळांना स्थलांतरित केले जाणार आहे. नवी मुंबईत सिडकोने प्रत्येक धार्मिक, सामाजिक संस्थेला धार्मिक स्थळ उभारण्यासाठी सुमारे १३१ अधिकृत भूखंड दिलेले आहेत. तरीही नवी मुंबईत खूप मोठय़ा प्रमाणात बेकायदेशीर धार्मिक स्थळे उभी राहिली आहेत. ही संख्या ४६७ पर्यंत पोहोचली आहे. यात मंदिरांची संख्या सर्वाधिक असून त्यानंतर मस्जिदींचा क्रमांक लागत आहे. इतर धार्मीयांची बेकायदेशीर धार्मिक स्थळे ही बोटावर मोजण्या इतकी आहेत. या बेकायदेशीर धार्मिक स्थळ उभारणाऱ्या संस्थांना सिडकोने एक संधी देण्याचे ठरविले असून पुढील आठवडय़ात धार्मिक व आध्यात्मिक उद्देशासाठी काही भूखंडांची जाहिरात काढली जाणार आहे. बेकायदेशीर धार्मिक स्थळ उभारणाऱ्या संस्थांना हे अधिकृत भूखंड घेता येणार आहे. त्यासाठी बेकायदेशीर धार्मिक स्थळ जमीनदोस्त करण्याची अट घातली जाणार आहे.
अधिकृत भूखंड देऊनही बेकायदेशीर धार्मिक स्थळांची संख्या वाढल्याने सिडकोने मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने यावर कारवाई करण्याचा आराखडा तयार केला असल्याचे सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालिका व्ही. राधा यांनी सांगितले. सिडकोच्या अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने ५६७ बेकायदेशीर बांधकामांची यादी नियोजन विभागाला दिली आहे. कोणती तोडायची आणि कोणती स्थलांतरित करायची याबाबत निर्देश मागितले आहेत. येत्या २० जानेवारीपर्यंत ही यादी आल्यानंतर बेकायदेशीर धार्मिक स्थळांवर कारवाई केली जाणार आहे, असे मुख्य नियंत्रक योगेश म्हसे यांनी स्पष्ट केले. नवी मुंबई पालिका क्षेत्रात केवळ ५४ बेकायदेशीर धार्मिक स्थळे असल्याचा अहवाल पालिका प्रशासनाने तयार केला आहे. तो न्यायालयाच्या डोळ्यात धुळफेक करणारा आहे. त्यामुळे सिडकोने केलेल्या सर्वेक्षणानुसार पालिकेला कारवाई करावी लागणार आहे. सिडको सध्या प्रकल्पग्रस्तांनी बांधलेल्या बेकायदेशीर बांधकामांवर हातोडा चालवीत असल्याने किमान पालिका क्षेत्रातील बेकायदेशीर धार्मिक स्थळांवर पालिकेने कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

सिडकोलाही पुरेसा वेळ
सिडकोने नवी मुंबई, पनवेल, उरण भागातील ९५ गावांत प्रकल्पग्रस्तांनी जानेवारी २०१३ नंतर बांधलेल्या ७५८ बेकायदेशीर बांधकामांची यादी तयार केली आहे. सध्या त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. आतापर्यंत ३१२ बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई करण्यात आली असून बुधवारी गोठवली, घणसोली येथे ही कारवाई करण्यात आली. पाडकाम करणाऱ्या प्रकल्पग्रस्ताला अथवा नागरिकाला त्याचे म्हणणे मांडण्याची पूर्ण संधी मिळावी, यासाठी सिडको ही कारवाई बुधवार ते शुक्रवार या तीन दिवसात करीत आहे. त्यामुळे पाडकामाची तयारी करण्यासाठी सिडकोलाही पुरेसा वेळ मिळत आहे.