News Flash

घरोघरी लसीकरण

जानेवारीपासून करोना लसीकरण सुरू झाल्यानंतर नवी मुंबई महापालिका प्रशासनाने योग्य नियोजन करीत जास्तीत जास्त नागरिकांना लस देण्यासाठी प्रयत्नशील आहे.

अंथरुणाला खिळलेल्यांसाठी नवी मुंबई महापालिकेचे नियोजन

नवी मुंबई : अपंगांसाठी ड्राइव्ह इन लसीकरण, बेघरांसाठी बस स्थानके व चौकांत जाऊन लसीकरणाचे स्तुत्य उपक्रम राबविल्यानंतर नवी मुंबई महापालिका प्रशासनाने आता अंथरुणाला खिळलेल्या नागरिकांसाठी त्यांच्या घरी जाऊन त्यांना लस देण्याचे ठरविले आहे. याचे नियोजन पूर्ण झाले असून लवकरात लवकर ही मोहीम सुरू होईल, असे पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले.

जानेवारीपासून करोना लसीकरण सुरू झाल्यानंतर नवी मुंबई महापालिका प्रशासनाने योग्य नियोजन करीत जास्तीत जास्त नागरिकांना लस देण्यासाठी प्रयत्नशील आहे. शासनाकडून उपलब्ध लस साठय़ानुसार शहरात लसीकरण सुरू आहे. मात्र लसच उपलब्ध होत नसल्याने लसीकरण केंद्रे बंद ठेवावी लागत आहेत. त्यामुळे पालिका प्रशासनाने जसा साठा उपलब्ध होईल तसे नियोजन करीत आतापर्यंत पहिली व दुसरी मात्रा मिळून ८ लाख ११ हजार १५९ जणांना लस दिली आहे. हे लसीकरण करताना वंचित घटकांसह शहरात संसर्ग पसरवू शकणाऱ्या घटकांना प्राधान्य देत लसीकरण केले आहे. यात अपंगांसाठी ड्राइव्ह इन लसीकरण करण्यात येत आहे. तर शहरातील बेघरांसाठी प्रशासनाने त्यांच्या जागेवर जात त्यांना लस दिली आहे. त्यानंतर शहरात जास्तीत जास्त संपर्कात असलेल्या घटकांसाठी विशेष लसीकरण मोहीम राबवत आहे.

आता पालिका प्रशासनाने अंथरुणाला खिळलेल्या व घरातून बाहेर पडू न शकणाऱ्या नागरिकांसाठी घरोघरी लसीकरण मोहीम राबविण्याचे ठरविले आहे. यासाठी संबंधित अंथरुणाला खिळून असलेल्या नागरिकांची पालिका हेल्पलाइनद्वारे माहिती घेत संबंधित डॉक्टरांकडून व त्यांच्या कागदपत्रावरून खात्री करून घेतल्यानंतर अशा व्यक्तींसाठी त्यांच्या घरी जाऊन लस दिली जाणार आहे. २३ नागरी आरोग्य केंद्रांमार्फत ज्या नागरी आरोग्य केंद्राच्या क्षेत्रात असे रुग्ण आहेत, त्यांच्या लसीकरणाची जबाबदारी त्या नागरी आरोग्य केंद्रांना देण्यात आली आहे. तसेच लस वाया जाऊ नये म्हणून दुपारनंतरच लसीकरण करण्याचे ठरविले आहे.

आतापर्यंतचे लसीकरण

६,३२,९४२

पहिली मात्रा

१,७८,२१७

दुसरा मात्रा

८,११,१५९

एकूण

आजही दुसरी मात्राच

शासनाकडून लसच मिळत नसल्याने नागरिकांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. मागील आठवडय़ात गुरुवारी ८ हजार कोविड लस व त्यानंतर शनिवारी ४३५० कोव्हिशिल्ड व २५० कोव्हॅक्सिन लस मिळाल्यानंतर अद्याप पालिकेला लस मिळाली नाही. त्यामुळे गुरुवारीही फक्त पालिकेच्या वाशी, नेरुळ, ऐरोली रुग्णालयातच कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या मात्रेचे लसीकरण होणार आहे.

शहरात अंथरुणावर खिळलेल्यांसाठी घरोघरी लसीकरण मोहीम राबविण्याची तयारी पालिकेने केली आहे. शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार ही मोहीम राबवण्यात येणार आहे. पालिकेने याबाबत नियोजन केले असून पुढील काही दिवसांत प्रत्यक्ष कार्यवाही करण्यात येईल.

– अभिजीत बांगर, आयुक्त, महापालिका

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 22, 2021 2:23 am

Web Title: planning navi mumbai municipal corporation those who are bedridden ssh 93
Next Stories
1 नवी मुंबईकरांची पाणी चिंता मिटली
2 वाहनांचे सुटे भाग विकणाऱ्यांकडून पामबीच मार्गावर ‘कोंडी’
3 आणखी पाचशे रुग्णशय्या
Just Now!
X