News Flash

वंडर्स पार्कमध्ये वृक्षवल्लींचा मेळा

यंदा प्रदर्शनाचे अकरावे वर्ष असून पहिल्याच दिवशी नवी मुंबई महापालिकेच्या शाळांनी भेट दिली.

पालिकेचे ११वे वनस्पती प्रदर्शन सुरू

नेरुळ येथील वंडर्स पार्कमध्ये भरविलेल्या झाडे, फुले, फळे व भाजीपाला प्रदर्शनात अनेक वनस्पती मांडण्यात आल्या आहेत. तिथे त्यांची माहिती देण्यात आली आहे आणि त्यांची काळजी कशी घ्यावी, याविषयीचे मार्गदर्शनही करण्यात येत आहे. फुलांची रांगोळी, फळे, फुले, भाज्या यांच्या कलात्मक रचना, बोन्साय, उद्यानरचना, उद्यानाशी संबंधित साहित्य, वृक्षांची रोपे, वेली, खते इत्यादींची विक्री करणारे आणि माहिती देणारे अनेक स्टॉल्स आहेत.

यंदा प्रदर्शनाचे अकरावे वर्ष असून पहिल्याच दिवशी नवी मुंबई महापालिकेच्या शाळांनी भेट दिली. बदलापूर, पुणे, मुंबई अशा विविध भागांतील नर्सरी प्रदर्शनात सहभागी झाल्या आहेत.

फुला-फळांची झाडे, औषधी वनस्पती मोठय़ा प्रमाणात मांडण्यात आल्या आहेत. फुलझाडे ५० ते ५०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. उद्यान कसे विकसित करावे, त्याचे संगोपन कसे करावे, हे समजावून सांगणाऱ्या प्रतिकृतीही प्रदर्शनात आहेत. इमारतींच्या आवारात, पदपथांच्या बाजूने, वाहतूक बेटांच्या सजावटीसाठी, बाल्कनीत किंवा गच्चीत कोणती झाडे लावावीत हे इथे जाणून घेता येईल.

जरबेरा, गुलछडी, सिंगल व डबल करंज, बकुळ, भेंड, कुमकुम, समुद्र फूल, पांगारा, ताम्हण अशी झाडे मांडण्यात आली आहेत. ठरावीक हंगामात येणारी फुले, वेली आणि झुडपे यांचा वेगळा विभाग आहे.

सेल्फ वॉटरिंग पॉट

झाडांना योग्य वेळी योग्य प्रमाणात पाणी मिळणे गरजेचे असते. मातीच्या कुंडय़ांमध्ये पाण्याचा अपव्यय होतो. काही वेळा अतिरिक्त पाणी वाहून जाते. हे टाळणारा सेल्फ वॉटरिंग पॉट प्रदर्शनात उपलब्ध आहे. त्यात ५ लिटर पाणी साठवून ठेण्याची क्षमता आहे. एकदा या पॉटमध्ये पाणी भरले की रोपाची मुळे त्यांना हवे तेव्हा आणि हवे तेवढेच पाणी शोषून घेतात. त्यामुळे थोडय़ाफार प्रमाणात पाणी बचत तर होतेच शिवाय वारंवार पाणी घालणेही गरजेचे राहत नाही.

आवश्यक साधने

रोपांची काळजी घेण्यासाठी, जमिनीच्या मशागतीसाठी आवश्यक असणारी साधने येथील स्टॉलमध्ये उपलब्ध आहेत. यामध्ये झाडांच्या फांद्या छाटण्यासाठी उपयोगी रिकिटर, कोको पिट, कीटकनाशके, बियाणे, सेंद्रिय खते उपलब्ध आहेत. सिंचनाचे प्रकार, उद्यानाची काळजी घेण्याच्या आधुनिक पद्धती यांची माहितीही दिली आहे.

औषधी वनस्पती

प्रदर्शनात मधुनाझी, दंती, आवळा, कोकम, अश्वगंधा, जायफळ, रुद्राक्ष, बिब्बा, सुरंगी, वावडिंग, शतावरी, डिकेमाली, पिंपळी, पाचोली, पुदिना, चिरफळ, वेखंड, मारवा, ओवा, कोष्टकोकिंजन, निर्गुडी अशा अनेक प्रकारच्या औषधी वनस्पती प्रदर्शनात आहेत. त्यांच्या गुणधर्माची माहितीही संबंधित वृक्षावर लावण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 4, 2017 12:45 am

Web Title: plant exhibition in wonders park nerul
Next Stories
1 खाऊखुशाल : पोटभर छोले भटुरे
2 रुग्णालयावर बेकायदा मोबाइल टॉवर
3 दहा रुपयांनी ज्वारी स्वस्त
Just Now!
X