महापालिकेचा निर्णय; आठ दिवसांत सुविधा

नवी मुंबई : नवी मुंबईत रमेडिसिविर इंजेक्शनसह अतिदक्षता खाटांची कमतरता भासत आहे. त्यात रक्तद्रवासाठीही रुग्णांच्या नातेवाईकांचा शोध सुरू आहे. मात्र शहरात एकही रक्तद्रव पेढी नसल्याने मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने आता वाशीतील पालिका रुग्णालयात रक्तद्रव पेढी निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच ही सुविधा सुरू करण्यात येणार आहे.

नवी मुंबईत सध्या सरासरी ९ करोना मृत्यूंचे प्रमाण आहे. त्यामुळे शहरातील करोना परस्थिती गंभीर असल्याचे दिसत असून अत्यवस्थ रुग्णांसाठी डॉक्टरांकडून रेमडेसिविर इंजेक्शनबरोबर रक्तद्रवाचीही मोठी मागणी होत आहे. मात्र शहरात रक्तद्रव बँक उपलब्ध नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांचा करोनामुक्त झालेल्या रुग्णांचा शोध सुरू असून ते त्यांना रक्तद्रव देण्यासाठी विनवणी करीत आहेत. खासगी रुग्णालयात अनेकांनी रक्तद्रव दान केले आहे. परंतु खासगी रुग्णालयातील रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना याचा फायदा होत आहे. ‘लोकसत्ता’ने रक्तद्रवासाठी शहरात गैरसोय होत असल्याचे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर पालिका आयुक्तांनी रक्तद्रव बँक निर्माण करण्याचे आश्वासन दिले होते. तसेच पालिकेच्या मदत कक्षात संपर्क करून रक्तद्रव दान करण्याचे आवाहनही केले होते. त्यानुसार आता पालिका प्रशासनाने वाशी येथील पालिका रुग्णालयात रक्तद्रव दान करण्याची सुविधा निर्माण करण्याचे ठरविले आहे. तसे पत्र त्यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना दिले असून लवकरात लवकर ही सुविधा निर्माण करण्यास सांगितले आहे.  रक्तद्रव दान करण्याची सुविधा तात्काळ निर्माण करण्यासाठी आयुक्तांशी पत्रव्यवहार केला असून या सुविधेमुळे सर्वसामान्य करोना रुग्णांना याचा फायदा होणार असल्याचे माजी आमदार संदीप नाईक यांनी सांगितले.