रस्त्यांवर प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांची विक्री; हजारो टन प्लास्टिक पिशव्या जप्त केल्याची पालिकेची आवई

हजारो टन प्लास्टिक पिशव्या जप्त केल्याची आवई देणाऱ्या नवी मुंबई पालिकाहद्दीत प्लास्टिक मुक्तीचा केवळ पोकळ नारा ठरला आहे. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने दोन दिवस अगोदरपासून पामबीच मार्गावरील सर्व सिग्नलवर सर्रास प्लास्टिक राष्ट्रध्वज विकले जात होते आणि त्यावर साधी कारवाई करण्याचे सौजन्य पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दाखवलेले नाही. त्यामुळे प्लास्टिकबंदी नवी मुंबई कागदावरच आहे.

नवी मुंबईत गुरुवारी झेंडा वंदनानंतर ‘प्लास्टिकमुक्त स्वच्छ शहर’ ठेवण्याची शपथ सर्व खासगी व शासकीय शाळेतील विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे. पालिका २१ व्या शतकातील हे शहर प्लास्टिक तसेच थर्माकोलमुक्त असावे यासाठी प्रयत्न करीत आहे, पण हे सर्व प्रयत्न कमी पडत असून शहरात ठिकठिकाणी प्लास्टिक पिशव्यांचा वापर सर्रास सुरू आहे. किराणामालाचे व्यापारी, मासे विक्रेते, रेल्वे स्थानकाबाहेरील फळ विक्रेते, आता तर चहादेखील प्लास्टिक पिशवीतून दिला जात आहे. या सर्व विक्रेत्यांकडे पालिकेच्या प्रभाग अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आहे. त्यामुळे प्लास्टिक वापर सर्रास सुरू आहे. स्वातंत्र्य दिनाच्या दोन दिवस अगोदरपासून पामबीच मार्गावरील नेरुळ जंक्शन, मोराज सर्कल, अरेंजा कॉर्नर, कोपरी नाका, या मोठय़ा सिग्नलवर सर्रासपणे प्लास्टिकचे झेंडे विकले जात होते. या मार्गावरून पालिकेतील अनेक अधिकारी दररोज अनेक वेळा प्रवास करतात, पण एकाही अधिकाऱ्याने ही विक्री थांबवली नाही. शहराच्या कानाकोपऱ्यात प्लास्टिक विक्री केली जात असून झोपडपट्टी भागात प्लास्टिक उत्पादन करणारे उद्योग सुरू आहेत. घनकचऱ्याचे वर्गीकरण करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या घरातील दोन कचराकुंडय़ा खराब होऊ नयेत यासाठी याच सिग्नलवर मोठय़ा प्रमाणात अतिशय किरकोळ आकाराच्या प्लास्टिक पिशव्या विकल्या जात आहेत. स्वच्छ भारत अभियानात हिरिरीने भाग घेणाऱ्या पालिकेला गेली अनेक वर्षे हे शहर प्लास्टिकमुक्त करण्यात अपयश आले आहे. तरीही या पालिकेला देशातील स्वच्छ शहराचा सातवा क्रमांक आणि राज्यातील पहिले शहर असल्याचा मान मिळाल्याने आश्र्चय व्यक्त केले जात आहे.

स्वातंत्र्यदिनी शाळांत प्लास्टिकमुक्तीचा जागर

  • नवी मुंबई महापालिकेच्या वतीने स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून प्लास्टिक प्रतिबंध व कचरा वर्गीकरण या विषयी शपथ घेण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. १५ ऑगस्ट रोजी पालिका व खासगी शाळांत ध्वजारोहणानंतर प्लास्टिकमुक्तीची शपथ घेण्यात येणार आहे.
  • नवी मुंबई हे आपले शहर स्वच्छतेत देशात सातव्या व राज्यात प्रथम क्रमांकाचे शहर असून हे मानांकन देशात प्रथम तीन क्रमांकात आणण्याचे ध्येय पालिकेने ठेवले आहे. त्यामुळे पुढील काळात विविध उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांमध्ये याविषयी जागृती निर्माण करण्यासाठी ही शपथ दिली जाणार आहे.