20 September 2018

News Flash

प्लास्टिकमुक्तीसाठी सहकार्य करा!

पालिका आयुक्तांचे आवाहन; आठ ठिकाणी संकलन केंद्र

पालिका आयुक्तांचे आवाहन; आठ ठिकाणी संकलन केंद्र

HOT DEALS
  • Apple iPhone 7 Plus 32 GB Black
    ₹ 59000 MRP ₹ 59000 -0%
  • Moto C Plus 16 GB 2 GB Starry Black
    ₹ 6916 MRP ₹ 7999 -14%

स्वच्छ सर्वेक्षणामध्ये यावर्षी घनकचरा व्यवस्थापनात देशात सर्वोत्तम शहराचा मिळालेला बहुमान हा नागरिकांच्या सक्रिय सहभागामुळेच मिळाला आहे. आता नवी मुंबई हे राज्यातील प्लास्टिक आणि थर्माकोलमुक्त शहर होण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त डॉ. एन. रामास्वामी यांनी केले. सर्वाच्या सहकार्याने नवी मुंबई शहर पहिले प्लास्टिक आणि थर्माकोलमुक्त शहर ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

नवी मुंबई महापालिका आणि लायन्स कल्ब इंटरनॅशनल यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने नेरुळ येथील वंडर्स पार्क येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘प्लास्टिक व थर्माकोलमुक्त नवी मुंबई’ या कार्यक्रमात ते बोलत होते.

प्लास्टिकशिवाय आपण काही वर्षांपूर्वी छान जगत होतो. आता मात्र खरेदीला जाताना सोबत कापडी पिशवी ठेवणे आपल्याला कमीपणाचे वाटते. हा चुकीचा समज आपण बदलला पाहिजे आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी, आपल्या पुढच्या पिढीला चांगली हवा, पाणी, पर्यावरण देण्यासाठी प्लास्टिक आणि थर्माकोलला रोजच्या वापरातून हद्दपार केले पाहिजे. आपण स्वत: गेल्या बारा वर्षांपासून प्लास्टिक पिशवी वापरतच नाही, असेही त्यांनी सांगितले.

तर लायन्स क्लब इंटरनॅशनल संस्थेचे माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर  सुरिंदर शर्मा यांनी स्वच्छता किंवा प्लास्टिक प्रतिबंध ही महानगरपालिकेची एकटय़ाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची वैयक्तिक जबाबदारी आहे असे मत व्यक्त केले.

आयुक्तांच्या हस्ते महानगरपालिकेच्या आठही विभाग कार्यालयात स्थापन करण्यात येणाऱ्या प्लास्टिक संकलन केंद्रात ठेवण्यात येणाऱ्या विशेष डब्यांचाही शुभारंभ करण्यात आला. नागरिकांनी आपल्या घरातील प्लास्टिक पिशव्या तसेच नको असलेले प्लास्टिक, सर्व प्रकारचे थर्माकोल आपल्या नजीकच्या विभाग कार्यालयात, तसेच  वंडर्स पार्क, पालिका मुख्यालय संकलन केंद्रात द्यावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

सप्तर्षी कला मंच यांनी ‘गो गो प्लास्टिक’ हे तर विश्व बालक केंद्र, नेरुळच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छता आणि प्लास्टिक प्रतिबंध हे पथनाटय़ सादर केले. नवी मुंबई महानगरपालिका आणि खाजगी शाळांतील विद्यार्थ्यांनी दैनंदिन जीवनात प्लास्टिक आणि थर्माकोलचा वापर करू नका असा संदेश शोभायात्रेतून दिला.

उपायुक्त तुषार पवार, दादासाहेब चाबुकस्वार, डॉ. अमरिश पटनिगेरे, नितीन काळे तसेच लायन्स क्लबचे माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन सुरिंदर शर्मा, मुकेश तनेजा, नमिता मिश्रा, छाया दुसाने आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.

९ टन प्लास्टिक संकलीत

आठही विभाग कार्यालय क्षेत्रात महानगरपालिकेने हाती घेतलेल्या प्लास्टिक आणि थर्माकोलमुक्त मोहिमेत ९ टन इतक्या मोठय़ा प्रमाणावर प्लास्टिक संकलित करण्यात आले. १५ लाख रुपयांपेक्षा अधिक दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आल्याची माहिती आयुक्तांनी दिली.

First Published on June 6, 2018 12:33 am

Web Title: plastic ban in maharashtra 18