पाणी, शीतपेयांच्या बाटल्या परत केल्यावरच अनामत मिळणार

घारापुरी बेटावर दररोज हजारो पर्यटकांकडून इतस्तत टाकण्यात येणाऱ्या प्लास्टिकच्या बाटल्यांमुळे बेटावर प्लास्टिक कचऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या बेटावर प्लास्टिकबंदी लागू करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. गुरुवारी रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी घारापुरी बेटाला भेट दिली. पर्यटकांनी शीतपेये किंवा पाण्याची बाटली विकत घेतल्यानंतर त्यासाठी दुकानदाराला अनामत रक्कम द्यावी आणि रिकामी बाटली परत करून अनामत रक्कमही परत घ्यावी, अशी व्यवस्था ठेवण्यात येणार आहे.

रायगडच्या महसूल व वन विभागाच्या वतीने घारापुरी येथे स्वच्छता अभियान व प्लास्टिकबंदीविषयी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, पर्यटन विभागाचे विजय वाघमारे, उरणच्या तहसीलदार कल्पना गोडे उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी पर्यटकांमुळे कचरा वाढला आहे, पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे प्लास्टिकवर  बंदी घालण्याचा निर्णय जाहीर केला.

कापडी पिशव्यांचा वापर

बेटावर वस्तू खरेदी करण्यासाठी कागदाच्या पिशव्यांचाच वापर करण्यात यावा. अशा प्रकारच्या पिशव्या बेटावरील स्थानिक महिला बचत गटांकडून तयार करून घेण्यात याव्यात, असे आदेश त्यांनी दिले. पर्यटकांची दिशाभूल करणाऱ्या गाईडवर कारवाई करून बेटावरील सुशिक्षितांना हा रोजगार उपलब्ध करून देण्याचाही निर्णय या बैठकीत घेण्यात आला.