धुळवडीत प्लास्टिक पिशव्यांचा वारेमाप वापर

राज्य सरकारने २ जानेवारीला प्लास्टिकबंदीचा अध्यादेश काढला. नवी मुंबई पालिका आयुक्तांनी शासनाने जारी केलेल्या अध्यादेशाचे काटेकोर पालन करण्याचे आदेश विभागप्रमुखांना दिले. पालिकेने प्लॅस्टिकबंदीसंदर्भात शहरभर जनजागृती अभियान राबवले, मात्र तरीही शहरात प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा सर्रास वापर होत आहे. धुळवडीला रस्तोरस्ती प्लॅस्टिकबंदीची होळी झाल्याचे चित्र होते.

धुळवडीला शहरात सर्वत्र ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांचा फुग्यांच्या स्वरूपात मोठय़ा प्रमाणात वापर करण्यात आला. शहरातील विविध अंतर्गत रस्त्यांवर अशा पिशव्यांचा खच पडला होता. २०१६ मध्ये तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरात प्लॅस्टिकविरोधी अभियान राबवत प्लॅस्टिकच्या पिशव्यांची विक्री आणि वापर करणाऱ्यांवर कडक कारवाई केली होती. पालिका मुख्यालयात व महासभा व स्थायी समितीतही पिण्याच्या पाण्यासाठी प्लॅस्टिकच्या बाटल्यांऐवजी स्टीलच्या बाटल्या ठेवण्यात येत होत्या. त्यामुळे एकीकडे प्लॅस्टिक विक्रेत्यांचे धाबे दणाणले होते; परंतु आता पुन्हा शहरात छुप्या पद्धतीने प्लास्टिक पिशव्यांची विक्री होऊ लागली आहे.

राज्य शासनाने महाराष्ट्र विघटनशील व अविघटनशील कचरा नियंत्रण कायद्याअंतर्गत प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी घातली आहे; परंतु नवी मुंबई शहरातील मोठी बाजारपेठ असलेल्या वाशीतील घाऊक बाजारात प्लॅस्टिक पिशव्यांची मोठय़ा प्रमाणात विक्री केली जाते. तेथूनच किरकोळ विक्रेते या पिशव्या विकत घेतात. त्यामुळे शहराच्या कानकोपऱ्यांत सर्रास प्लॅस्टिक पिशव्यांची विक्री आणि वापर सुरू आहे.

महापालिकेने जानेवारी २०१६ ते डिसेंबर २०१७ या दरम्यान प्लॅस्टिकच्या पिशव्या विकणाऱ्या २१० दुकानांवर कारवाई करत १० लाख ९५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. तरीही शहरात किरकोळ व्यापाऱ्यांकडून ग्राहकांना आजही प्लॅस्टिकचे ताट, कप, प्लेट्स, चमचे, वाटय़ा विकल्या जात आहेत. याबाबत अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता, तो होऊ शकला नाही.

प्लॅस्टिकविक्री करणाऱ्यांवर पालिकेच्या वतीने कारवाई करण्यात येत आहे. वाशीमध्येही किरकोळ व घाऊक पद्धतीने प्लॅस्टिकविक्री करणाऱ्यांवर पालिका सातत्याने कारवाई करत आहे.   – महेंद्रसिंग ठेके, विभाग अधिकारी, वाशी