विमानतळ भूमिपूजन सोहळ्यासाठी सिडको, पोलीस, जिल्हाधिकाऱ्यांकडून नियोजन

संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात मुहूर्तमेढ रोवण्यात आलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाचा प्रारंभ राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या काळात होत असल्याने त्याचा फायदा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेला २५ हजार श्रोते उपस्थित राहतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पंतप्रधानांच्या भेटीसंदर्भातील नियोजन राज्य सरकारच्या वतीने सिडको, नवी मुंबई पोलीस, रायगड जिल्हाधिकारी आणि विशेष पोलीस दलाच्या वतीने केले जात आहे. कार्यक्रमाच्या आधी तीन दिवस स्थानिक सुरक्षा यंत्रणेकडून केंद्रीय सुरक्षा यंत्रणा या जागेचा ताबा घेणार आहे. पंतप्रधानांसाठी तीन हेलिपॅड तयार करण्यात आली आहेत.

१८ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दुपारी तीन वाजता या प्रकल्पाच्या कामाचा प्रारंभ होत आहे. गेले सात महिने या प्रकल्पासाठीची विमानतळपूर्व कामे सिडकोच्या वतीने सुरू करण्यात आली आहेत.

नवी मुंबईत पहिल्यांदाच होणाऱ्या पंतप्रधान मोदी यांच्या कार्यक्रमासाठी राज्य सरकारने जोरदार तयारी सुरू केली आहे. विमानतळ प्रकल्पातील कोंबडभुजे गावाच्या हद्दीत हा कार्यक्रम होणार असून या निमित्ताने पंतप्रधानांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी सुमारे २५ हजार श्रोते व कार्यकर्ते येतील असा अंदाज बांधण्यात आला आहे. त्यांच्या वाहनांच्या व्यवस्थेसाठी भव्य वाहनतळ उभारण्यात आला आहे. पंतप्रधानांच्या हेलिकॉप्टरसाठी तीन हेलिपॅड तयार करण्यात आली आहेत.

पंतप्रधानांच्या विशेष सुरक्षा यंत्रणेने खात्री करून घेतल्यानंतरच त्यांचे हेलिकॉप्टर उतरविले जाणार आहे. ते कोणत्या हेलिपॅडवर उतरविले जाणार आहे, याची स्थानिक पोलीस यंत्रणेला कोणतीही कल्पना देण्यात आलेली नाही.

शुक्रवारपासून केंद्रीय सुरक्षा यंत्रणा या जागेचा ताबा घेणार आहेत. त्यानंतर स्थानिक सुरक्षा यंत्रणेची कोणताही हस्तक्षेप या कार्यक्रमात होणार नाही. हा संपूर्ण परिसर निर्मनुष्य असल्याने या ठिकाणी फारशा उपाययोजना काराव्या लागणार नाहीत, पण सभा आणि कार्यक्रमांच्या काळात साडेसहा हेक्टरच्या परिसरात या काळात परवानगीशिवाय येण्यास मनाई केली जाणार आहे.

१५ धातूशोधक यंत्रे

सभा मंडपाच्या जवळपास श्रोत्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी ओळखपत्रे देण्यात आली आहेत. सर्वसाधारण श्रोते आणि कार्यकर्त्यांना १५ धातूशोधकांतून प्रवास केल्यानंतरच सभास्थानी सोडण्यात येणार आहे. प्रकल्पग्रस्तांचा संभाव्य विरोध लक्षात घेऊन स्थानिक पोलीस प्रकल्पग्रस्तांच्या स्थानिक नेत्यांशी संवाद साधत असून कार्यक्रमाच्या दिवशी कोणतीही गडबड न करण्याची सूचना देत आहेत. या तयारीसंदर्भात अधिकृत माहिती देण्यास कोणीही तयार नाही पण सिडकोच्या वतीने आमची तयारी झाली असून उद्या ही जागा एसपीएच्या स्वाधीन केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले.

  • वाहनांच्या व्यवस्थेसाठी भव्य वाहनतळ
  • साडेसहा हेक्टरच्या परिसरात या काळात येण्यास मनाई
  • हेलिकॉप्टरसाठी तीन हेलिपॅड