नेरुळ येथील भाजी व्यापाऱ्याच्या खूनाचा तपास

नवी मुंबई नेरुळ येथील एका भाजी व्यापाऱ्याच्या हत्येचे गूढ उकलले असून व्यसनाधीन असलेल्या मुलानेच तीन लाखांची सुपारी देत वडिलांची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणातील तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

अनिल गुंड (वय ३१), संतोष लांडे (वय २५), आणि रोहन बरगे (वय २५), अशी अटक आरोपींचे नावे आहेत. एपीएमसीमध्ये भाजीचा व्यवसाय करणारे अरविंद गुंड हे राहण्यास नेरुळ येथील शिरवणे गावात होते. त्यांना अनिल हा मुलगा आणि एक मुलगी असून ती विवाहित आहे. अरविंद पहाटे २ वाजता भाजी बाजारात जाऊन लिलाव व इतर व्यवहार आटोपून दुपारी १२ च्या सुमारास घरी येत असत. मुलगा अनिल हा काहीही कामधंदा करीत नसत.

दिवसभर चिलीम ओढणे आणि मिळेल त्या ठिकाणी बसणे असा त्याचा दिनक्रम असे. वडील अरविंद त्याला पैसे देत नव्हते. कामधंदा कर म्हणून तगादा लावत असत. त्यामुळे वडिलांच्या विषयी त्याच्या मनात चीड होती. त्याच्या सोबत व्यसन करणारे संतोष आणि रोहन यांना

वडिलांना मारण्याची अनिल याने ३ लाखांची सुपारी दिली. त्यानुसार हे दोघे घरात अरविंद असताना वातानुकूलीन यंत्र दुरुस्तीच्या बहाण्याने घुसले. दोघांनी मिळून धारधार शस्त्राने वार करीत अरविंद यांना ठार केले.

घटनेनंतर अनिल अर्धा तासाने घरी आला व त्याला हे अचानक कळल्याचा आव आणून पोलिसांना फोन केला. त्याने तो एपीएमसी मार्केटमध्ये होता, अशी माहिती पोलिसांना दिली. मात्र तो पूर्ण वेळ शिरवणेत असल्याचे मोबाईल लोकेशनवरून दिसत असल्याने पोलिसांचा संशय बळावला. यावरून पोलिसांनी संशयावरून त्याला ताब्यात घेतले. पोलिसी हिसका दाखवताच गुन्ह्य़ाची कबुली दिली.

अनिल याने मारेकऱ्यांना ८० हजार दिले असून उर्वरित रक्कम नंतर देण्याचे ठरले होते. आरोपी मुलाला २ ऑगस्ट तर त्याच्या साथीदारांना ३ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली असल्याचे पोलीस निरीक्षक सुनील गवळी यांनी सांगितले.