नवी मुंबई : फसवणूकप्रकरणी कारवाई टाळण्यासाठी दीड लाख रुपयांची लाच मागणाऱ्या एका पोलीस उपनिरीक्षकाला  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (एसीबी) मुद्देमालासह अटक केली. यात अन्य एक जण जाळ्यात अडकला.

रोहित बंडगर असे कारवाई झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे, तर या प्रकरणात नितीन जोशी यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

रोहित बंडगर हा कामोठे पोलीस ठाण्यात सेवेत आहे. याच भागातील एका फिर्यादीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. चौकशीअंती त्याच्यावर कारवाई करण्यात येणार होती. मात्र त्याआधी या प्रकरणातून सुटका करण्यासाठी फिर्यादीने बंडगर याला दीड लाख रुपयांची लाच देण्याची तयारी दर्शवली. याबाबत ठाणे लाच प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आली होती. त्यानुसार मंगळवारी कामोठे येथे एका ठिकाणी ५० हजार रुपयांचा पहिला हप्ता घेण्यासाठी बंडगरने फिर्यादीला बोलावले होते. हप्त्याचे पैसे स्वीकारताना रोहितला अटक केली.