पोलीस भरती उमेदवारांसाठी खायला कोंडा, निजेला धोंडा; १५ हजार तरुणांची आज अग्निपरीक्षा

राज्याची कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सरकारला हवे असलेले पोलीस मंगळवारी होणाऱ्या भरतीतून निवडले जातीलच; पण यासाठी सध्या दुष्काळाने होरपळत असलेल्या बीड, वाशीम आणि उस्मानाबाद जिल्ह्य़ातील शेकडो तरुण एक स्वप्न उराशी घेऊन नवी मुंबईत आले आहेत. खाण्यापिण्याची, राहण्याची सोय  खिजगणतीतही नसलेल्या या तरुणांनी नवी मुंबई पोलीस मुख्यालयाच्या कठडय़ासमोर पथारी पसरली आहे. त्यात पोलीस प्रशासनाने भरती केंद्रांचे चुकीचे पत्ते छापल्याने झालेली अमाप पायपीट आणि तीन आसनी रिक्षाचालकांनी केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी तब्बल ८०० रुपये भाडय़ाचा प्रस्ताव ठेवल्याने उमेदवारांच्या हालात आणखीन भर पडली.

मंगळवारी ७८ पोलीस पदांसाठी १५ हजार उमेदवारांची स्पर्धा येथे होणार आहे. यासाठी सोमवारचा दिवस आणि रात्र साऱ्या उमेदवारांना आकाशाच्या छताखालीच काढावे लागणार आहे. सध्या रोडपाली परिसरात मुख्यालयाशेजारी रखरखीत उन्हात तरुणांचे तांडे दाखल झाले आहेत. ज्यांचे नातेवाईक नवी मुंबईत आहेत, त्यांनी दोन दिवसांची राहण्याची सोय केली आहे; मात्र इतरांनी मुख्यालयाशेजारील पदपथावर पथारी पसरली आहे. विशेष म्हणजे या साऱ्याचा सामना करीत असताना काही उमेदवारांच्या मुलाखत अर्जावर चुकीचा पत्ता छापला गेल्याने काहींना रणरणत्या उन्हात भरती केंद्र शोधून काढावे लागले.

वाशीम आणि बीड जिल्ह्य़ातील तरुणांनी ‘महामुंबई वृत्तांत’शी बोलताना सांगितले की, या वेळी भरतीचा ‘पॅटर्न’ बदलण्यात आला आहे. पहिल्या दिवशी उमेदवारांचे शारीरिक मोजमाप आणि कागदपत्रे तपासली जातील. त्यानंतर तारीख आणि वेळ जाहीर करण्यात येईल. त्यामुळे अनेक जण संभ्रमात आहेत. गावी परतण्यासाठी दोन हजार रुपयांचा खर्च येतो. भरतीसाठी पुन्हा बोलावण्यात आल्यास या खर्चात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. उमेदवार ताटकळत उन्हात उभे राहून आरोग्याच्या समस्येला तोंड देत असल्याच्या घटना टाळण्यासाठी पुढील दिवसांची वेळ व तारीख ही नवी पद्धत अवलंबली आहे. दिवसाला २ हजार उमेदवारांची शारीरिक मोजमाप आणि कागदपत्रे तपासणी होईल, अशी माहिती पोलीस उपायुक्त दिलीप सावंत यांनी दिली. दरम्यान, भरती प्रक्रियेसाठी नवी मुंबईतील शंभर अधिकारी व ५०० कर्मचारी असे ६०० पोलीस सज्ज करण्यात आले आहेत.