मानसिक संतुलन बिघडल्याने आत्महत्येचा प्रयत्न

नवी मुंबई</strong> : मानसिक संतुलन बिघडल्याने पाण्याच्या टाकीवर चढून आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका युवतीला पोलिसांनी बोलण्यात गुंतवून आत्महत्या करण्यापासून वाचवले. ही घटना रविवारी वाशी सेक्टर १७ येथे घडली.

सोनल द्विवेदी (वर २०) असे या युवतीचे नाव आहे.  येथील जय जवान सोसायटीच्या पाण्याच्या टाकीवर चढून ती आत्महत्या करण्याच्या तयारीत होती. याबाबत नागरिकांनी पोलिसांना कळविताच पोलीस नाईक अमृत साळी व दत्तात्रय रोंगटे हे घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन पथकदेखील  त्या ठिकाणी पोहोचले. तिची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र ती काहीही प्रतिसाद देत नव्हती. दरम्यान अमृत साळी व दत्तात्रय रोंगटे हे मागील बाजूने टाकीवर चढले. हवालदार मानसी लाड यांनी तिला बोलण्यात गुंगवून ठेवले. ती बेसावध असताना त्या दोघंनी तिच्यावर झडप घालत तिला आत्महत्या करण्यापासून रोखले. नंतर हवालदार मानसी लाड टाकीवर चढल्या व त्यांनी तिला ताब्यात घेतले. तिचे मानसिक संतुलन बिघडले होते, आत्महत्येचे काय कारण हे समजू शकले नाही, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ यांनी सांगितले.

नैराश्य वाढतेय

काही दिवसांपूर्वी  पिंपळगाव नाशिक येथून नवी मुंबईत आलेला एक युवक वाशी खाडीवरील पुलावरू आत्महत्या करण्याचा प्रयत्न करीत होता. याबाबत माहिती मिळताच वाशी पोलिसांनी त्वरित हालचाल करीत घटनास्थळी पोहोचले व सदर युवकास त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिले. हा युवक नैराश्याच्या भरात आत्महत्या करण्यास तयार झाला होता.