29 October 2020

News Flash

पोलीस दलातील तंदुरुस्ती पथकाच्या मदतीने करोनामुक्तीची पायवाट सोपी

करोनामुक्तीचा मार्ग सोपा करण्यात या पथकाचे मोलाचे साह्य नवी मुंबई पोलिसांना लाभले आहे.

प्रतिकात्मक छायाचित्र

उपचाराधीन पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांची संख्या दोन महिन्यांत  ५०० वरून २६

नवी मुंबई : नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील पोलीस कर्मचाऱ्यांना करोनाकाळात उपचार घेत असताना कोणतीही उणीव भासू नये, यासाठी ऑगस्टच्या मध्यावधीस तयार केलेल्या तंदुरुस्ती पथकाला (वेलनेस टीम) ऑक्टोबरच्या मध्यावधीस मोठे यश लाभले आहे. करोनामुक्तीचा मार्ग सोपा करण्यात या पथकाचे मोलाचे साह्य नवी मुंबई पोलिसांना लाभले आहे. सप्टेंबरमध्ये ५००हून अधिक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपचाराधीन होते. ही संख्या आता २६ वर आली आहे. तर पोलीस दलातील मृत्यूचे प्रमाण शून्यावर आले आहे.

तंदुरुस्ती पथकाने गेल्या दोन महिन्यांत उपचाराधीन पोलीस कर्मचाऱ्यांना रुग्ण शोध ते करोना उपचार केंद्रातील उपचारांपर्यंतची मदत पुरवली. संशयितांना तत्काळ शोधून त्यांची चाचणी करणे, चाचणीत संशयितांना ताप, खोकला, डोकेदुखी ही लक्षणे आढळल्यानंतर त्यांना करोना काळजी केंद्रात दाखल करणे, त्याच वेळी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये तशीच लक्षणे दिसत आहेत का, याची एकाच वेळी पाहणी करण्याची आणि त्याची माहिती पोलीस आयुक्तांना देण्याची महत्त्वाची जबाबदारी या पथकावर होती. आजही ते ही जबाबदारी पार पाडत आहेत. वैद्यकीय अधिकाऱ्यांशी योग्य समन्वय राखत ही किमया साधल्याची प्रतिक्रिया नवी मुंबई पोलिसांनी दिली.

देशात २३ मार्चपासून लागू झालेल्या टाळेबंदीचा सर्वाधिक ताण पोलिसांवर होता. घरी राहण्याच्या नियमाची अंमलबजावणी पोलिसांना रस्त्यावर उतरून करावी लागली. सुरुवातीला बाधितांची संख्या मर्यादित असली तरी संसर्ग पसरू नये, यासाठी नागरिकांना ‘स्व-अलगीकरणात’ ठेवण्याची मुख्य जबाबदारी पोलिसांनीच पार पाडली. मात्र, पावसाळ्यानंतर पोलिसांमध्ये संसर्ग पसरल्याचे कटू वास्तव अधिकाऱ्यांना पचवावे लागले आणि तत्कालीन आयुक्त संजयकुमार यांनी  तंदुरुस्ती पथकाची स्थापना केली. पथकात दोन उपायुक्त एक सहाय्यक पोलीस आयुक्त आणि दोन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली. विद्यमान पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह यांनी तंदुरुस्ती पथकाला पूर्ण मोकळीक दिली आहे.

पोलिसांसाठी खास आरक्षित असलेल्या सावली आणि निवारा अलगीकरण केंद्रात सध्या दहा टक्क्यांपर्यंत खाटा भरलेल्या आहेत. सुरुवातीला या केंद्रात खाटा उपलब्ध होत नव्हत्या.

उपचाराधीन

  • पोलीस अधिकारी  ३ – (स्व-अलगीकरणात )
  •  पोलीस कर्मचारी २२ – (४ स्व-अलगीकरणात)
  •  कुटुंबातील सदस्य  १६

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 16, 2020 12:25 am

Web Title: police force fitness squad corona liberation police officer police worker wellness team akp 94
टॅग Coronavirus
Next Stories
1 पुन्हा निकृष्ट हातमोज्यांचा पुरवठा
2 नवी मुंबईत रुग्णदुपटीचा काळ १११ दिवसांवर 
3 सातपट वाढीव मालमत्ता देयके
Just Now!
X