पोलीस मुख्यालयालाही वाहनांचा गराडा

नवी मुंबई : सीबीडीत बेकायदा पार्किंगची समस्या गंभीर झाली असून पोलीस आयुक्तालय व वाहतूक पोलीस उपायुक्त कार्यालयाबाहेरही मोठ्या प्रमाणात बेकायदा पार्किंग होत आहे. यात सर्वाधिक वाहने ही पोलीस कर्मचाऱ्यांचीच असल्याने यावर कारवाई केली जात नाही.

सिडकोने बेलापूर हा नोड ‘सीबीडी’ (सेंट्रल बिझनेस डिस्टिक) म्हणून विकसित केला असून या ठिकाणी सर्व महत्त्वाची व मोठी कार्यालये आहेत. त्यात कोकण भवन, आरबीआय, स्टेट बँक सरोवर, कोकण रेल्वे कार्यालय, सिडको, पोलीस आयुक्तालय, महापालिका मुख्यालय याच्यासह राज्य शासनाच्याही अनेक विभागांचा कारभार या ठिकाणी चालवला जातो.  या सर्व इमारतींमध्ये वाहनतळाची व्यवस्था केलेली आहे. मात्र वाहने रस्त्यावरच पार्क केली जातात. कात या कार्यालयात कामानिमित्त भेटी देणाऱ्या नागरिकांसह कर्मचाऱ्यांची वाहनेही असतात.

या सर्वच इमारती संवेदनशील असल्याने सुरक्षा म्हणून जर आत वाहने उभी करून दिली जात नसतील तर इतर ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करणे गरजेचे आहे. मात्र इमारतीत पार्किंगला जागा नाही म्हणून रस्त्यावर वाहने उभी करणे अयोग्य असल्याचे सीबीडी सेक्टर ४ येथील रहिवासी अरविंद जाधव यांनी सांगितले.

या सर्व कार्यालयांबाहेर बेकायदा पार्किंग केले जाते. त्यात सर्वाधिक वाहनांचा गराडा  असतो तो पोलीस आयुक्तालय कार्यालयासमोर. वास्तविक आयुक्तालय कार्यालय आवारात पुरेशी जागाही आहे. मात्र या जागेत भंगार, जुन्या गाड्या ठेवण्यात आल्या आहेत. या भंगार सामानाची विल्लेवाट लावली व दुचाकी वाहनांसाठी आत पुरेशी जागा उपलब्ध केल्यास रस्त्यावरील पार्किंग बंद होऊ शकते, असे येथीलच एका कर्मचाऱ्याने सांगितले.

सिडको कार्यालयात येणाऱ्यांचीही मोटी अडचण होत आहे. गाडी उभी करण्यासाठी जागेच्या शोधात परिसरात भटकावे लागत आहे. सिडकोभवन इमारतीत वाहनतळासाठी जागा कमी असल्याने काही वर्षांपूर्वी शेजारीच असलेला एक भूखंडावर पार्किंगची व्यवस्था केली आहे. मात्र तेथील सुरक्षारक्षक हे ओळखीचे लोक, कंत्राटदार आणि सिडको कर्मचारी यांचीच वाहने लावण्यास परवानगी देतात. त्यामुळे इतरांना वाहन जागा मिळेल तेथे उभे करावे लागत आहे.

सीबीडी भागात मागील दोन महिन्यांत बेकायदा पार्किंग केलेल्या २ हजारपेक्षा जास्त वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. यापुढेही कारवाई करण्यात येईल. सर्वच कार्यालयांबाहेरील परिस्थितीचा आढावा घेत कारवाई केली जाईल. – जगदीश शेलकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाहतूक विभा