21 January 2019

News Flash

भूखंड मिळूनही पोलीस ठाण्याची रखडपट्टी

कोपरखैरणेतील पोलिसांचे हाल

कोपरखैरणेतील पोलिसांचे हाल

कोपरखैरणे पोलीस ठाण्याच्या इमारतीसाठी सिडकोने भूखंड देऊन १० वर्षे लोटली, तरी अद्याप ही इमारत उभारण्यात आलेली नाही. या परिसरातील लोकसंख्येची घनता पाहता सुसज्ज पोलीस ठाणे उभारण्यासाठी सिडकोने मोठा भूखंड दिला आहे, मात्र तरीही येथील कर्मचारी दोन सरकारी यंत्रणांच्या अनास्थेचे बळी ठरत आहेत.

कोपरखैरणे पोलीस ठाण्याचा गाडा सध्या सेक्टर सहा येथील श्रीगणेश मार्केटच्या पहिल्या मजल्यावरून हाकला जात आहे. हा भाग पूर्वी तुर्भे पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असे. मात्र वाढत्या लोकसंख्येमुळे कोपरखैरणे पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली. त्या वेळी तीन टाकी पोलीस चौकीचे पोलीस ठाण्यात रूपांतर झाल्यामुळे जागा कमी पडू लागली. त्यामुळे कोपरखैरणे ठाणे सेक्टर सहा येथील जागेत स्थलांतरित करण्यात आले. पोलीस ठाणे हे सामान्यपणे तळमजल्यावर असते, हे ठाणे मात्र पहिल्या मजल्यावर आहे.

सुमारे दहा वर्षांपूर्वी सिडकोने सेक्टर २० येथे १,९३९ चौरस मीटरचा एक भूखंडही दिला. मात्र येथे पोलीस ठाण्याची इमारत कोणी बांधावी, या वादात ती इमारत अडकली. २०१०-११मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाला प्रस्ताव पाठवण्यात आला होता. लालफितीच्या कारभारामुळे या प्रस्तावाला अडीच वर्षांनंतर मंजुरी देण्यात आली, मात्र तोपर्यंत बांधकाम साहित्याचे दर एवढे वाढले होते की संमत झालेल्या प्रस्ताव किमतीत ही इमारत बांधणे कोणालाही शक्य नव्हते. त्यामुळे बांधकाम पुन्हा बारगळले. त्यानंतर खारघर, कामोठे, एनआरआय ही पोलीस ठाणी सिडकोने बांधून दिली, मात्र कोपरखैरणे पोलीस ठाणे अद्यापही साकार झालेले नाही. सिडकोनेच कोपरखैरणे पोलीस ठाणे बांधावे अशी विनंती करण्यात आली आहे. तसा प्रस्तावही सादर केला गेला आहे, मात्र यालाही पाच वर्षे उलटली आहेत. अद्याप पोलीस ठाण्याची इमारत दृष्टिपथात नाही. सध्या याच भूखंडावर तात्पुरत्या स्वरूपात कोपरखैरणे वाहतूक विभागाचे कार्यालय थाटण्यात आले आहे. यंदाच्या वार्षिक पत्रकार परिषदेत आयुक्त हेमंत नगराळे यांनी आगामी वर्षांत काय करायचे, याची यादी सादर केली होती. या यादीत कोपरखैरणे ठाण्याच्या इमारतीचा समावेश करण्यास ते विसरल्याचे समोर आले आहे.

कोपरखैरणे पोलीस ठाण्याच्या इमारतीबाबत सिडकोशी पत्रव्यवहार सुरू आहे. त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. येत्या काही महिन्यांत कामाला सुरुवात होईल, अशी आशा आहे.    – प्रवीण पवार, उपायुक्त प्रशासन

पोलिसांकडून हा प्रस्ताव आला असून काही तांत्रिक त्रुटी दूर करण्यात आल्या आहेत. लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.   – मोहन निनावे, जनसंपर्क अधिकारी, सिडको

सध्याच्या पोलीस ठाण्यातील समस्या

  • पहिल्या मजल्यावर असल्याने गर्भवती, ज्येष्ठ नागरिक व आजरी व्यक्तींना तिथे जाणे त्रासाचे ठरते.
  • दर पावसाळ्यात मोठय़ा प्रमणात डागडुजी करून घ्यावी लागते. गळके छत, पाणी झिरपणाऱ्या भिंती, कुंद वातावरण, स्वच्छतागृहाची अपुरी जागा, महिला कर्मचाऱ्यांसाठी अपुऱ्या सोयी अशा अनेक समस्या आहेत.
  • या पोलीस ठाण्यात कोठडीही नाही. त्यामुळे आरोपीला कोठडीत ठेवावे लागणार असल्यास एपीएमसी पोलीस ठाणे गाठावे लागते. आधीच कर्मचारी कमी असताना आरोपींना एपीएमसी पोलीस ठाण्यात नेण्या-आणण्यातच एक गाडी व चार ते पाच पोलीस कर्मचारी कायमच गुंतलेले असतात. त्यांच्या सुरक्षेचाही प्रश्न गंभीर आहे.

First Published on May 17, 2018 12:11 am

Web Title: police in bad condition at kopar khairane