नववर्षांचे जल्लोषात स्वागत करताना कोठेही अनुचित घटना घडू नये, यासाठी नवी मुंबई पोलिसांनी कडेकोट बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. मद्यप्राशन करून वाहने चालविणाऱ्यांना अटक करण्याचे आदेश पोलीस उपआयुक्त शहाजी उमाप यांनी दिले आहे. नवी मुंबईतील सर्व प्रमुख चौकांत नाकेबंदी करून तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. यासाठी विशेष फिरत्या पथकांसह सुमारे पाच हजार पोलीस बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत.

नववर्षांच्या स्वागतासाठी ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री ठिकठिकाणी गर्दी होत असते. यादरम्यान अनेक जण मद्यप्राशन करून वाहने चालवितात. त्यामुळे अपघात तसेच हाणामारीसारखे प्रकार होतात. अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी खास उपाययोजना केल्या आहेत. या दरम्यान पाम बीच मार्गासह इतर महत्त्वाच्या मार्गावर प्रत्येक चौकात नाकाबंदी करून वाहनांची तसेच वाहनमालकांची तपासणी करण्यात येणार आहे. गर्दीच्या ठिकाणी साध्या वेशातील वाहतूक पोलीस तैनात असतील. ज्या हॉटेल वा कार्यक्रमाच्या ठिकाणी महिलांची छेडछाड होत असल्याचे आढळून येईल, त्या हॉटेलचा परवाना त्वरित रद्द करण्यात येईल, अशी तंबी पोलिसांनी दिली आहे.

कोणालाही काहीही अडचणी असल्याच तर नवी मुंबईच्या नियंत्रण कक्षाच्या १००, ०२२-२७५६१०९९, ०२२-२७५७४९२८ या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.