गणेश मंडळाच्या नावाखाली जुगारासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या मंडळांवर पोलिसांची नजर राहाणार असून यासाठी गणवेश परिधान ने केलेली पोलिसांची विशेष पथके तयार करण्यात आली आहेत.
नवी मुंबई यंदा १९८ सार्वजनिक आणि दोनशेच्या आसपास सोसायटी गणेश मंडळांची स्थापना करण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी बसवल्या जाणाऱ्या गणेश मंडळांची नोंद पालिकेत असते तर सोसायटीत बसवल्या गेलेल्या मंडळांची नोंद करण्यात येत नाही. सार्वजनिक मंडळांच्या मंडपात पडद्याआड अनेक ठिकाणी जुगार खेळला जातो. विशेष म्हणजे आरतीच्या वेळा सोडून २४ तास हा जुगार सुरू असतो. जुगार खेळणाऱ्यांसाठी इतर सुविधांबरोबर पालिसांवर नजर ठेवण्यासाठीही व्यवस्था केली जाते.
गणेशेत्सव काळात पोलिसांना बंदोबस्त असल्याने अनेकदा कारवाई होत नसल्याने हा प्रकार मोठय़ा प्रमाणात सुरू असतो. त्यामुळे यावर्षी या जुगार अड्डय़ांवर पोलिसांचे बारीक लक्ष राहणार आहे. खातरजमा करून गणवेश न घातलेले पोलीस पथक या ठिकाणी कारवाई करणार आहेत.
मंडळात जुगार चालवणाऱ्यांवरही कठोर कारवाई केली जाईल. केवळ जुगार नव्हे तर कोणताही अनुचित प्रकार खपवून घेतला जाणार नाही. गणेशभक्तांनीही तसे आढळल्यास जवळचे पोलीस ठाणे वा १०० या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करावा.-पंकज डहाणे, पोलीस उपायुक्त, परिमंडळ १
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 4, 2019 2:47 am