सकस, हलक्या आहाराची गरज असताना वडापाव किंवा बिर्याणी

नवी मुंबई अनेक तास शारीरिक मेहनतीचे काम असेल तर सकस व हलक्या आहाराची गरज असताना बंदोबस्तावरील पोलिसांचे आहाराकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. बंदोबस्तावर असताना त्यांना वडापाव किंवा बिर्याणी हा आहार सर्रास दिला जात असल्याने पोलिसांचे आरोग्य बिघडत आहे. नुकत्याच झालेल्या चौथ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीत नवी मुंबईत बंदोबस्तावरील तीन पोलिसांचे ‘आरोग्य’ बिघडल्याने त्यांनी रग्णालयात दाखल करावे लागले होते.

राज्यातील कायदा व सुव्यवस्था सांभाळणाऱ्या पोलिसांचा आरोग्याकडे नेहमीच दुर्लक्ष होत असते. मात्र त्यामुळे अनेक आजारांना त्यांना सामोरे जावे लागते. वर्षांत किमान शंभर दिवस पोलीस बंदोबस्तावर असतात, मात्र त्यांनी आहार म्हणून वडा पाव किंवा बिर्याणी दिली जाते.

वर्षांचा पहिल्या दिवसापासून पोलिसांचा बंदोबस्त सुरू होतो. २६ जानेवारी प्रजासत्ताक, १४ फेब्रुवारी व्हॅलेंटाइन डे, छत्रपती शिवाजी महाराज जयंती, मार्चमध्ये होळी, एप्रिलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, जुलैनंतर नागपंचमी, दहीहंडी, स्वतंत्रता दिवस, गणपती, दसरा दिवाळी, ख्रिसमस आणि शेवटी ३१ डिसेंबर हे पोलिसांचे बंदोबस्ताचे दिवस. त्याच रमजान, मूहरम, हाय अलर्ट, अतिक्रमण, विविध आंदोलन, शहरात ‘व्हीआयपी’ कार्यक्रम या वेळीही बंदोबस्त असतो. असे वर्षभरात किमान १०० दिवस पोलीस बंदोबस्तावर असतात. मात्र या वेळी त्यांच्या आहाराची काळजी घेताना पोलीस प्रशासन दिसत नाही. त्यांना वडापाव किंवा बिर्याणी असा आहार दिला जातो. बिर्याणी ही चटकदार असली तरी रक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणा, पोटाचा घेर, अशा विविध आजारांनी ग्रस्त पोलिसांसाठी आणखी आरोग्य बिघडवणारी ठरू शकते. भुकेच्या नादात बिर्याणीवर ताव मारला जात त्यामुळे पित्ताचा त्रास वाढू शकतो.

लोकसभा निवडणुकीसाठी बंदोबस्तावर असलेल्या रबाळे पोलीस ठाणेअंतर्गत कार्यरत असलेल्या तीन पोलीस कर्मचाऱ्यांना नुकताच याचा त्रास झाला. दोघे चकर येऊन तर एक रक्तदाब वाढल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते.

बंदोबस्तावेळी नेमका काय आहार दिला जावा याबाबत कुठलेही निर्देश नसल्याने वागवण्यास सोपे व बंदोबस्तावर घाई गडबडीत खाणे सोपे असल्याने बिर्याणीला प्राधान्य दिले जाते, मात्र ते पोलिसांचे आरोग्य बिघडवणारे ठरू शकते.

या बाबत अनेक पोलीस कर्मचाऱ्यांशी चर्चा केली असता, आमचे कोण ऐकणार? असे म्हणून ते त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. आमच्यातील बहुतांश लोक कोकण बाहेरचे असून आमच्या आहारात भात क्वचित असतो, मात्र बंदोबस्तावर भातावर भूक भागवावी लागत असल्याचेही काहींनी सांगितले.

अनेक तास शारीरिक मेहनतीचे काम असेल तर सकस व हलक्या आहाराची गरज असते. चमचमीत व मसालेदार पदार्थ खाऊ नयेत. आळस वा झोप येईल असा कुठलाही पदार्थ खाऊ  नये, त्याचे दीर्घकालीन दुष्परिणाम शरीरावर होऊ  शकतात.

– डॉ. शाम सरदेशमुख, आहारतज्ज्ञ