एक कोटी रुपये हडपले ; पाच जणांना अटक
हवाल्याची एक कोटी रुपयांची रक्कम लुटणाऱ्या पोलिसांना वाशी पोलिसांनी अटक केली आहे. त्यात दोन पोलीस अधिकारी व एका पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश आहे. याव्यतिरिक्त आणखी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. अन्य चार जण फरार आहेत.
कर्नाटकातील रहिवासी असलेल्या मोहम्मद सलीम यांनी वाशी पोलीस ठाण्यात हवाल्याची एक कोटी रुपयांची रक्कम लुटली गेल्याची तक्रार अलीकडेच नोंदवली होती. सलीम हे मुंबईतून एक कोटी रुपये घेऊन कर्नाटकात निघाले होते. त्यांच्या प्रवासाची माहिती त्यांचे मित्र अफसर याला होती. अफसर याने त्याच्या अन्य चार मित्र व ट्रॉम्बे पोलिसांच्या मदतीने ही रक्कम लुटण्याचा कट आखला. चार दिवसांपूर्वी सलीम जव्हेरी बाजारातून हवाल्याची रक्कम घेऊन निघाले असता अफसर व त्याच्या मित्रांनी त्यांचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक पंकज खैरनार, पोलीस उपनिरीक्षक नीलेशकुमार संदानशिव व पोलीस निरीक्षक जनार्दन राजे, बलराज मरकडेय व लक्ष्मण मरकडेय यांनी वाशी टोलनाक्यावर पाळत ठेवली.
सलीम ज्या बसने कर्नाटकात निघाले होते, ती बस वाशी टोलनाक्यावर येताच या सर्वानी मोहम्मद सलीम यांना गाडीतून उतरवून घेत स्कॉर्पिओ गाडीत बसवले. त्यानंतर त्यांच्याकडील रक्कम लुटत सलीम यांना उरण येथील एका निर्जन रस्त्यावर फेकून दिले. नंतर स्कॉर्पिओ गाडीने सर्वजण मुंबईत आले व आपापसांत पैसे वाटून घेतले.
तीन पोलीस अधिकाऱ्यांना प्रत्येकी १४ लाख रुपये घेतले तर उर्वरित पैसे घेऊन अफसर पसार झाला. नवी मुंबई पोलिसांनी वाशी टोलनाक्यावरील सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींना पकडले. त्यांच्याकडून ४८ लाख रुपये हस्तगत करण्यात आले असून उर्वरितांचा शोध सुरू असल्याची माहिती परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त शहाजी उमप यांनी दिली.