पनवेल शहराची सुरक्षेची स्थिती; गुन्हेगारीतील वाढ चिंताजनक

पनवेल तालुक्याच्या परिसरात वाढते शहरीकरण लक्षात घेऊन या परिसरात कामोठे, खांदेश्वर ही पोलीस ठाणी उभी राहिली, परंतु अपुरे पोलीस बळ हे सुरुवातीपासून या पोलीस ठाण्यांना लागलेले ग्रहण आहे. शहरांच्या परिसरातील वाढत्या घरफोडय़ा व वाहनचोऱ्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलीस बळ येथे तैनात नसल्याचे उघड होत आहे. तीन हजार व्यक्तींमागे एक पोलीस अशी अवस्था सध्या पनवेलच्या शहरी परिसरातील सुरक्षेची बनली आहे.

राज्याच्या पोलीस महासंचालकांनी प्रत्येक नागरिकाला पोलीसमित्र बनविण्याची जबाबदारी पोलिसांवर टाकल्यापासून पनवेल तालुक्यात पोलीसमित्रांची साथ आली आहे. पोलिसांनी महासंचालकांचे आदेश पाळण्यासाठी स्थानिक पोलिसांनी रस्त्यावरील बंदोबस्तापेक्षा जनजागृतीच्या बैठकांना महत्त्व दिले आहे. यामध्ये महिलांचे मेळावे, पालक-विद्यार्थ्यांच्या शालेय बैठका, व्यापारी व बँंकांच्या प्रतिनिधींच्या बैठका तसेच सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधी व गृहनिर्माण सोसायटय़ांमधील रहिवाशांमध्ये जागरूकता वाढावी म्हणून सूचनांसाठी बैठका हेच सध्या पोलिसांचे काम बनल्याचे चित्र पनवेलमध्ये दिसते. या सर्व बैठकांमध्ये पोलीस रमल्याने पनवेल शहर, कामोठे, कळंबोली व खांदेश्वर या पोलीस ठाण्यांमध्ये घरफोडय़ा व वाहनचोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. या पोलीस ठाण्यांची मुळात ओरड अपुऱ्या पोलीस बळाची होती. मात्र पोलीस आयुक्तांसमोर हा प्रस्ताव कोण ठेवणार अशा दुहेरी संकटात हे पोलीस आहेत. दिवसाआड वाहनचोरी, घरफोडी आणि तीन दिवसाआड मंगळसूत्र चोरीचा चढता आलेख या परिसरातील गुन्ह्य़ांचा तपशील नोंदवत आहे. १०० पोलीस बळ असलेल्या पोलीस ठाण्यात साप्ताहिक सुट्टी, इतर कामांसाठी ४५ पोलीस सकाळी व २५ पोलीस रात्रपाळीला रस्त्यावर प्रत्यक्षात तैनात असतात. एका पोलीस ठाण्यात जिथे तीन पोलीस निरीक्षक असणे अपेक्षित आहे, तेथे एकाच पोलीस निरीक्षकांच्या खांद्यावर संपूर्ण पोलीस ठाण्याचा डोलारा उभा आहे. पनवेल शहर पोलीस ठाण्यात ५० अतिरिक्त पोलीस कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. इतर पोलीस कर्मचाऱ्यांच्या सुटय़ा मंजूर करणाऱ्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना स्वत:ची साप्ताहिक सुटी घेणे या अपुऱ्या पोलीस बळाने मुश्कील केले आहे. रविवारच्या इतरांच्या सुटी दिवशी पनवेलचे काही अधिकारी स्वत: शहरात गस्त घालत फिरत असतात. अशीच अवस्था खांदेश्वर व कळंबोलीची आहे. आयुक्त साहेबांसमोर अपुऱ्या बळाची व्यथा मांडावी कशी असा यक्षप्रश्न या पोलीस अधिकाऱ्यांना पडला आहे. काही पोलीस चालत-फिरत शहरावर लक्ष ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र शहरी भागात चोर एकीकडे आणि पोलीस दुसरीकडे असे चित्र पाहायला मिळते. किमान पोलीस मुख्यालयात राखीव पोलीस फोर्स बंदोबस्तासाठी मिळाल्यास या अपुऱ्या पोलीस बळावर मार्ग निघेल असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.

अपुऱ्या पोलीस बळाविषयी संबंधित परिसरातील वाढलेल्या गुन्ह्य़ांचा तपशील पाहून जेथे गुन्हे कमी झाले आहेत तेथील पोलीस बळ हलवून गरज असलेल्या पोलीस ठाण्यांना ते पोलीस देऊ. परंतु हा निर्णय पोलीस उपायुक्तांच्या बैठकीत लवकरच घेतला जाईल, नागरिकांनी याबाबत सतर्कता बाळगणे गरजेचे आहे.

प्रभात रंजन, नवी मुंबई पोलीस आयुक्त