एका आरोपीला अटक; तिघे फरार

नवी मुंबई : कळंबोली येथील उद्यानात झालेल्या खून प्रकरणाचा उलगडा पोलिसांनी केला आहे. लूटमार करण्याच्या प्रयत्नात झालेल्या मारहाणीतून हा प्रकार घडला होता. या प्रकरणी एका आरोपीस अटक केली असून त्याचे तीन साथीदार फरार आहेत.

नागनाथ कलाप्पा माले असे मृत व्यक्तीचे नाव असून  शिष्मश भोसले या आरोपीला अटक करण्यात आली आहे.  कळंबोली येथे राहणारे विश्वास संतोषकर यांच्याकडे त्यांचा मेव्हणा नागनाथ हे आले होते. ते कर्नाटकातील हुमानाबाद येथील रहिवासी असून मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात. ४ नोव्हेंबर रोजी कळंबोली सेक्टर २ ई  येथील उद्यानात फेरफटका मारत असताना चार जणांनी त्यांना धमकावत लूट सुरू केली. त्यांनी प्रतिकार केला. चारही आरोपींनी त्यांनी मारहाण करीत चाकूहल्ला केला. यात गंभीर जखमी होत त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्याकडील हजार रुपये घेऊन चौघेही पसार झाले होते. याबाबत कळंबोली पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंद केला होता. याच्या तपासासाठी पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली १९ जणांचे पथक नेमले होते. या पथकाने दोन दिवस साध्या वेशात उद्यानात गस्त घातली. उद्यानात गर्दी नसताना काही गुंड दमदाटी करून पैसे, चीजवस्तू लूटतात अशी माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी उद्यानाच्या आत साध्या नागरिक असल्याप्रमाणे वावर सुरू केला. मिळालेल्या माहितीनुसार संशयित आरोपी आल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. चौकशीत त्याने गुन्हा कबूल केला, अशी माहिती पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी दिली.