12 November 2019

News Flash

‘टाइमबॉम्ब’प्रकरणी पोलीस निलंबित

संशयिताचे छायाचित्र समाजमाध्यमांवर झळकल्याने कारवाई

संग्रहित छायाचित्र

संशयिताचे छायाचित्र समाजमाध्यमांवर झळकल्याने कारवाई

पनवेल : कळंबोली येथे टाइमबॉम्ब ठेवल्याप्रकरणाचा तपास करत असताना एका पोलिसाने तपासातील संशयिताचे छायाचित्र खासगी व्यक्तीला दिल्याने संबंधित संशयिताचे छायाचित्र समाजमाध्यमांवर झळकले. नवी मुंबईच्या पोलीस आयुक्त संजयकुमार यांनी यामुळे एका पोलिसावर निलंबनाची कारवाई केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. निलंबित पोलीस हे कळंबोली पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत.

१५ दिवसांपूर्वी कळंबोली येथील सुधागड विद्यालयाच्या प्रवेशद्वारावर एका हातगाडीवर टाइमबॉम्ब ठेवण्यात आला. नवी मुंबई व दहशतवाद विरोधी पथक या दोनही तपास यंत्रणा या प्रकरणाचा तपास करीत आहेत. संबंधित बॉम्ब कळंबोलीपासून चार किलोमीटर अंतरावर निर्जनस्थळी निकामी करण्यात आला. या प्रकरणात एक संशयित व्यक्तीचे छायाचित्र पोलिसांच्या हाती लागले. बॉम्ब हातगाडीवर ढकलत विद्यालयाजवळ आणण्यात आला.

लोकवस्तीतून बॉम्बचा हातगाडीवरील प्रवास हे तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी नवीन आहे. या गंभीर गुन्ह्य़ाचा तपास करणे, हे नवी मुंबई पोलिसांसमोर आव्हान आहे. या प्रकरणातील प्रत्येक पुराव्यापासून प्रसारमाध्यमांना दूर ठेवण्यात येत आहे. १७ जून रोजी उन्हाळी सुट्टीनंतर विद्यालयातील विद्यार्थ्यांचा प्रवेशाचा पहिला दिवस होता. बॉम्ब ठेवणाऱ्यांनी कळंबोलीतील सुधागड विद्यालय का निवडले, या परिसराची रेकी करण्यात आली होती का, ही हातगाडी कुठून आणली होती, हातगाडी ढकलणारा संशयित कुठून व कोणत्या वाहनातून आला होता, तो जाताना कोणत्या दिशेने व कोणत्या वाहनातून गेला हे व अशा अनेक प्रश्नांचा मागोवा तपास करणारे अधिकारी घेत आहेत. पोलिसांनी परिसरातील व सिडको मंडळाचे अनेक सीसीटीव्ही कॅमेरे तपासल्यानंतर त्यांच्या हाती बरेच काही पुरावे हाती लागले आहेत. मात्र पोलीस आयुक्त संजयकुमार यांना विचारल्यावर त्यांनी या प्रकरणात तपासाला अद्याप गती आली नसल्याचे स्पष्ट केले. याप्रकरणी एका पोलिसाला निलंबित केल्याच्या वृत्ताला दुजोरा देत योग्य वेळी प्रसारमाध्यमांसमोर याप्रकरणी आयुक्त स्वत: बोलतील, असेही आयुक्त संजयकुमार यांनी सांगितले.

First Published on July 3, 2019 4:40 am

Web Title: police suspended in time bomb found at kalamboli case zws 70